राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या फडणवीस सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्र्याच्या उपसमितीच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील मोर्च्यात फूट पाडत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. येत्या १८ तारखेला मराठा क्रांती मोर्चा नागपूरमध्ये धडकणार आहे. यावेळी गनिमी कावा करून सरकारला धडा शिकवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देऊन समाजाची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटील यांना मराठा समाजाच्या चळवळीत फूट पाडायची आहे. पुणे,औरंगाबाद,कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते स्वत:ला मराठा समाजाचा नेता म्हणून भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मंत्र्यांच्या उपसमितीमधून हटवण्यात यावे, अशी मागणी आबासाहेब पाटील यांनी केली. या पत्रकार परिषेदेला मराठा क्रांन्ती मोर्चाचे राज्य समन्वयक आबा पाटील, रमेश केरे-पाटील, रविंद्र काळे पाटील, ॲड. संतोष सुर्यराव, सचिन गवांदे आदी उपस्थित होते.