मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. राज्य सरकारकडून करोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर इतर मुद्यांवरही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या या जनसंवादावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या ‘घराच्या बाहेर पडा’ टीकेला उत्तर दिलं होतं. आपण राज्यातील सर्व स्थितीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या याच विधानावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणाले की,’जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे मी पोहोचलो. दुर्गम भागात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो. मुळात हे वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा मातोश्रीमध्ये लपून राहण्यासाठी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे किती रुग्णालये आणि कोविड सेंटरचं तुम्ही निरीक्षण केलं? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते आपली जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली यांचे उत्तर राज्याच्या जनतेला द्यावं. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं अशी झाली आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. “करोनापासून बचाव करण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा विविध पद्धतीनं काळजी घेतो आहे. त्यापेक्षा सरकारी पातळीवर आरोग्य यंत्रणेद्वारे प्रभावी उपायोजना कशी करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगणे अपेक्षित होते. तसे न करता मुख्यमंत्री उपदेशाचे निरर्थक डोस पाजत बसल्यानं सामान्य माणसाची निराशा झाली. मुख्यमंत्र्यांच्या संवादातून राज्याचे अर्थचक्र गतिमान होण्यासाठी ठोस घोषणा होतील अशीही अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याबाबतही स्पष्ट दिशादर्शन केले नाही,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.