21 January 2019

News Flash

कोल्हापुरातील बेकायदा नियमित केलेल्या अतिक्रमणांवर घाव घालणार

एरवी संयत भाषेत बोलणारे महसूलमंत्री पाटील आज भलतेच आक्रमक झाले होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांचा इशारा

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणांवर कारवाईचा मुद्दा आता राजकीय वळणावर पोहोचला असून, कोल्हापूर शहरातील बेकायदा नियमित केलेल्या अतिक्रमणांवर  घाव घालण्याचा इरादा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सरकारी जागेवर हॉटेल, बगिचा, मंगल कार्यालय, वाहनतळ बांधले गेले असल्याने त्यासह सर्व प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. शेतकरी संघातही असाच प्रकार झाला असल्याने तेथेही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तावडे हॉटेल परिसरातील जागा कोल्हापूर महानगरपालिकेची, की उचगाव ग्रामपंचायतीची हा वाद गेली  न्यायप्रविष्ट असताना अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी बेकायदेशीरपणे टोलेजंग इमारती उभ्या केल्या. उच्च न्यायालयाने येथील सुमारे २५० एकर जागा महापालिकेची असल्याचा निर्णय देत या जागेवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत. तर या बांधकामांना अभय देण्याचे काम महसूलमंत्री पाटील करत आहेत, असा आरोप विरोधी काँग्रेस गोटातून होत आहे.

आपले नाव पुढे येत असल्याने मंत्री पाटील यांनी या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या जागेची मालकी कोणाची या बाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर कोणालाही हक्क सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

वाद राजकीय पातळीवर

तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणावरून कोल्हापूर महापालिकेत वाद तापला आहे. आज पाटील यांनीही सरकारी जागांवर बांधलेले हॉटेल, बगिचा, मंगल कार्यालय, वाहनतळ हे शर्तीभंग करून कसे बांधले आहे याची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या बांधकामावरून आमदार सतेज पाटील यांना त्यांचे स्पर्धक महादेवराव महाडिक हे सतत लक्ष्य करत असतात. आज ही बांधकामे पालकमंत्र्यांच्या तोंडी प्रथमच आली. हे पाहता यानिमित्ताने महसूलमंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री यांच्यातील महापालिकेतील वाद आता राजकीय पातळीवर आला आहे.

महसूलमंत्र्यांचा आक्रमक रोख

एरवी संयत भाषेत बोलणारे महसूलमंत्री पाटील आज भलतेच आक्रमक झाले होते. माझा संबंध नसताना अतिक्रमणसारख्या प्रकरणाशी नाव जोडण्याचा प्रकार होत आहे, हे आता सहन करण्याच्या पलीकडे आहे. मी अन्नात माती कालवणारा नाही.  मुंगीला धक्का लागला तरी ती चावा  घेते, पण मी एका बाजूला थप्पड लगावली म्हणून दुसरा गाल पुढे करणाऱ्यातला नाही. मी बलाढय़ मंत्री आहे याची जाणीव ठेवावी. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी आपण कोठे राहतो याची जाणीव ठेवावी, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर शरसंधान केले.

First Published on April 14, 2018 3:37 am

Web Title: chandrakant patil warn to take action against illegal construction