एकीककडे देशभरासह राज्यात करोनाने थैमान घातलेलं असताना दुसरीकडे राज्यात राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीच्या मुद्यावरून सध्या राजकीय फटकेबाजी जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदरच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला होता. त्यावर आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान म्हणजे या वर्षातील जगातला सर्वात मोठा विनोद असल्याचं ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांना घरी बसवण्यात महाआघाडीतीलच काही लोक प्रयत्नशील आहेत, असं चंद्रकातं पाटील म्हणाले होते. यावर आपलं काय म्हणनं आहे. असा प्रश्न विचारण्यात आल्यावर हसन मुश्रीफ म्हणाले, यापूर्वीही कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि राज्यातील भाजापाचे दोन नंबरचे नेते चंद्रकांत पाटील याच्याबद्दल मी सातत्याने सांगितलं होतं. सत्ता गेल्यामुळे ते फार अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत. हे जे त्यांचं विधान या वर्षीचा जगातला सर्वात मोठा विनोद असं संबोधण्यासारखं आहे. अनेक प्रसारमाध्यामांनी त्याची दखलही घेतलेली नाही. हे खूळं काय बोलतय अशा पद्धतीने त्याची अहवेलना केलेली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आहे. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. त्यात आम्हाला बोट कशाला लावता,” असा गौप्यस्फोट त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला होता.