मूल तालुक्यातील जानाळा येथे लग्न समारंभात नियमबाह्यरित्या ५० पेक्षा जास्त लोकांना सहभागी करून, लग्न समारंभात वधु-वरांसह उपस्थितांना करोनाची लागण झाल्यामुळे लग्न समारंभ आयोजकांवर फौजदारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण अधिनियमांतर्गत विविध प्रतिबंध जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेले आहे. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर प्रतिबंध केलेला आहे व त्या नियमांच्या अधीन राहून मूलच्या तहसिलदारांनी २९ जून रोजी होणाऱ्या लग्न समारंभाला परवानगी दिली होती. परंतू, या लग्नसमारंभात १४०च्यावर लोकांची उपस्थिती होती. त्यापैकी एक करोनाबाधित असल्याने अनेक लोकांना त्याचा संसर्ग झाला व जिल्ह्यात करोनाच्या रुग्ण संख्येत एकाकी वाढ झाली.

धार्मिक कार्यक्रम घरगुती पद्धतीने करावेत या कार्यक्रमांना ५० किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सक्तमनाई करण्यात आली आहे. परवानगी देताना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्यामुळे लग्न समारंभ आयोजकांवर भा.दं.वि. कलम १८८, २६९ व २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना विषाणूबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती व मार्गदर्शक मोहीम राबवून अशा प्रकारच्या कार्यक्रमांस ५० पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र न येता, तसेच प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मूल तालुका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.