चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लगत असलेल्या शेतात काम करणाऱ्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

वनाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्यपाल दयाराम नागोसे (वय ४०, रा. बाम्हणगांव) या व्यक्तीचा आपल्या शेतात काम करीत असताना जवळच दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने मृत्यू झाला आहे. ताडोबा कोअर व बफर झोन लगत सातारा शेतशिवारातील जंगलामधील आपल्या शेतात नागोसे काम करीत होते. वाघाने सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला चढवला.

यापूर्वी याच परिसरात चारवेळा वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. गावालगत जंगल असल्याने वाघ व इतरही वन्यप्राण्यांचा या भागात नेहमीच वावर असतो. यापूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला तसेच सातारा येथील महिलेला वाघाने ठार मारले होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, मृत शेतकऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुगणल्यात नेण्यात आला आहे.