पाच ग्रामस्थांचा जीव घेणाऱ्या वाघाला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या  कोलारापासून जवळच असलेल्या जैसी तलाव येथे बेशुध्दीचे इंजेक्शन देवून आज (बुधवार) सायंकाळी पाच वाजता जेरबंद करण्यात आले. ही कामगिरी ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

ताडोबा प्रकल्पा लगत चिमूर या तालुक्याच्या ठिकाणाहून १० कि.मी. अंतरावर कोलारा परिसरात या वाघाने मागील तीन महिन्यात पाच लोकांचे बळी घेतले होते. यामुळे गावात  दहशतीचे वातावरण होते. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. वाघाला जेरबंद केले नाही तर आम्हीच वाघाचा बंदोबस्त करू असा इशाराही संतप्त ग्रामस्थांनी दिला होता.

दरम्यान, मंगळवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभाग नितीन काकोडकर यांनी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश निर्गमीत केले. त्यानंतर आज सकाळपासून ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांच्या नेतृत्वात वाघाला जेरबंद करण्याची मोहिम सुरू झाली. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ताडोबा प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्राच्या अगदी सीमेवर जैसी तलाव येथे ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन मारून वाघाला बेशुध्द केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांना विचारले असता, जेरबंद वाघाला लवकरच नागपूर लगत गोरेवाडा प्राणी बचाव केंद्र येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती  त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.