शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयातून एमबीबीएसची पदवी घेवून बाहेर पडलेल्या पहिल्याच बॅचचे २० डॉक्टर करोना बाधित रूग्णांसाठी अक्षरश: देवदूतासारखे धावून आले आहेत. आजच्या कठीण प्रसंगी जिथे डॉक्टर, फिजिशियन, भूलतज्ञ वैद्यकीय सेवा देण्यास टाळाटाळ करत आहेत, तिथे या तरूण डॉक्टरांनी सेवा देण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्व २० डॉक्टरांची कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदावर सहा महिन्यांसाठी नियुक्ती केली गेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात करोना संक्रमण इतक्या वेगाने होत आहे की, दररोज १५०० बाधित आणि २५ ते ३० जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा अक्षरश: हादरली आहे. आज घडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन ते चार फिजिशियन व दोन भूलतज्ञ आहेत. त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार घेणाऱ्या या सर्व बाधित रूग्णांची जबाबदारी आहे. १८ ते २० तास डॉक्टरांना सेवा द्यावी लागत आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पुण्यातील खासगी कंपनीकडे डॉक्टर, परिचारिका तथा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पूर्ततेची मागणी केली होती. मात्र या कंपनीकडेही पुरेस मनुष्यबळ नाही. अशा कठीण प्रसंगी सर्व हतबल झाले असतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरूण हुमने यांनी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेवून बाहेर पडलेल्या पहिल्या बॅचमधील तरूण डॉक्टरांना करोना बाधितांना वैद्यकीय सेवा देण्याची विनंती केली. तसेच हा विषय पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निदर्शनास आणून दिला. कंत्राटी कंपनीही डॉक्टर तथा वैद्यकीय कर्मचारी पुरविण्यात असमर्थ ठरत आहे, तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचला नियुक्त करून त्यांची सेवा घेण्यास काय हरकत आहे? असा विषय बैठकीत मांडला.

पालकमंत्री वडेट्टीवार, जिल्हाधिकारी गुल्हाने यांनाही या तरूण डॉक्टरांना नियुक्ती देण्याचा विषय पटला. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहिरात दिल्याप्रमाणे या सर्व डॉक्टरांच्या मुलाखती पार पडल्या. त्यानंतर या २० डॉक्टरांची कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली. यामध्ये ४ भूलतज्ञ डॉक्टरांचाही समावेश आहे. ही नियुक्ती केवळ सहा महिन्यांसाठी आहे. भूलतज्ञांना प्रत्येकी २ लाख रूपये तर डॉक्टरला एक लाख रूपये महिना पगार दिला जाणार आहे. खनिज विकास निधीतून हा प्रगार दिला जाणार आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता डॉ.अरूण हुमने यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे २० डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्याची माहिती लोकसत्ताशी बोलतांना दिली. एकाचवेळी २० डॉक्टर मिळाल्याने आता बाधितांना घाबरण्याची गरज नाही असेही ते म्हणाले.