करोना टाळेबंदीत बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर १४ दिवसांच्या गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या मूल येथील साईकृपा राईस मिल व ओम साईराम राईस मिलच्या संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राईस मिलमध्ये २५ पेक्षा अधिक मजूरांना करोनाची लागन झाली आहे.

करोना टाळेबंदीत १४ दिवसांच्या गृह विलगीकरण नियमांचे पालन करण्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी कडक निर्देश दिले आहेत. मात्र आजही गृह विलगीकरण पाळले जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मूल येथील साईकृपा राईस मिलचे संचालक व्यंकण्णा चकू व सहदेव भोयर तसेच ओमसाईराम राईस मिलचे संचालक दादाजी येरणे यांनी बिहार राज्यातून कामासाठी मजूर आणले. मजूर आणतांना विलगीकरण तथा गृह विलगीकरण आदेशाचे सक्त पालन करावे असे या दोन्ही राईस मिल मालकांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्याचा परिणामी या दोन्ही राईस मिलमध्ये २५ पेक्षा अधिक करोनाबाधित आढळून आले.

या प्रकरणी मूलचे तहसीलदार यांच्या तक्रारीवरून साईकृपा व ओमसाईराम राईस मिलच्या मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जानाळा येथे ५० लोकांची परवानगी असतांना १३० पेक्षा अधिक लोकांना निमंत्रीत करून विवाह समारंभ साजरा करणाऱ्या आयोजकाविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.