राजुरा शहरातील गजबजलेल्या नाका नंबर तीन चौकात केस कापण्यासाठी आलेल्या कोळसा व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी राजू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सुत्रांच्या माहितीनुसार, दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी दुकानात जाऊन देशी कट्ट्याने यादव यांच्यावर चार गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. गोळीबाराचा आवाज एकताच चौकातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांनी त्या युवकाचा पाठलाग केला असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी एकाच गर्दी केली.
मृत राजू यादव (वय ४५) यांचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला आहे. राजुरा शहरात प्रथमच गोळीबार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेच्या तपासासाठी दोन पथक तयार करण्यात आली असून आरोपी तेलंगणा राज्यात पळल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 10:03 pm