करोनामुक्तीसाठी या चंद्रपूर जिल्ह्यात ३८ कोटी ९० लाखांचे नियोजन केले असून २४ कोटी २९ लाखांचा निधी वितरीत केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर वडेट्टीवारांचा निधी दिल्याचा दावा फसवा आहे, निधी दिला असता तर जिल्हा प्रशासनाला विभागीय आयुक्तांकडे ४ कोटींच्या निधीसाठी विनवनी करण्याची वेळच आली नसती, असं  माजी खासदार नरेश पुगलियांचे म्हणणे आहे. दरम्यान करोनाच्या निधीवरून कॉग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाल्याचे दिसत आहे.

वडेट्टीवार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून २४ कोटींचा निधी दिल्याचे सांगितले. तसेच, खनिज विकास निधीतून व्हेंटिलेटर व प्रयोगशाळेसाठी ५ कोटी, जिल्हा विकास निधीतून २२ कोटी ९४ लाखांचे नियोजन आहे, त्यापैकी २१ कोटी ५३ लाख वितरीत केले आहे. खनिज विकास निधीतून १३ कोटी ४६ लाखांचे नियोजन आहे, त्यापैकी २ कोटी २६ लाख दिले. आपत्ती व्यवस्थापनातून २ कोटी ५० लाख दिले, महापालिका आयुक्तांना २ कोटी ३३ लाख दिले, तर नगर परिषद व नगर पंचायतींना ७ कोटी ५० लाख दिले. याशिवाय ३५ रूग्णवाहिका खरेदीसाठी निधी दिला जाणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हा करोना मुक्त राहील यासाठी संपूर्ण जिल्हा यंत्रणा अतिशय प्रभावीपणे काम करीत आहे. मात्र ही वेळ आरोग्य यंत्रणा देखील बळकट करण्याची असून करोनाच्या  पार्श्वभूमीवर आवश्यक सर्व यंत्रसामुग्री व यंत्रणा बळकट करावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रयोगशाळेची पायाभूत सुविधा निर्माण झाली आहे. तथापि,यंत्र विदेशातून येत असल्यामुळे सध्या त्याठिकाणी तपासणी सुरू व्हायची आहे. ही तपासणी लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

तर  दुसरीकडे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र पाठवून पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी २४ कोटींचा निधी दिल्याचा दावा फसवा असल्याचे म्हटले आहे. आपत्ती व नियोजन विभागाकडून केवळ २.५० कोटीचा निधी मिळाला आहे. या अत्यल्प निधीत सक्षम आरोग्य सेवा उभी कशी करावी? असा प्रश्न प्रशासनाला आहे. शासकीय महाविद्यालयात ४२० खाटांसाठी लागणारे ऑक्सिजन, १० अतिरिक्त व्हेंटिलेटर आणि २० अतिदक्षता विभागातील खाटा यासाठी ४ ते ५ कोटींची गरज असल्याची मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे. या जिल्ह्याला आवश्यक निधी त्वरीत द्यावा, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल  पालकमंत्री दिशाभूल करित असल्याचे पुगलिया यांनी म्हटले आहे. दरम्यान करोनाच्या निधी वितरणावरून कॉग्रेस पक्षातच शितयुध्दाला सुरूवात झाली आहे.