कोतवाल निवडीत मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून थेट नक्षलवाद्यांच्या रडारवर आलेल्या गडचिरोली जिल्हय़ातील सिरोंचाच्या तहसीलदाराला मोठय़ा बंदोबस्तात जिल्हा मुख्यालयात आणावे लागले. भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही संरक्षण देण्याची वेळ आल्याने जिल्हय़ातील पोलीस सध्या कमालीचे वैतागले आहेत.
राज्यात पोलिसांची प्रतिमा खराब असली तरी गडचिरोली जिल्हय़ातील पोलीस मात्र जिवावर उदार होऊन नक्षलवाद्यांविरुद्ध लढत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जोखमीची कामगिरी बजावणाऱ्या या पोलिसांवर मंगळवारी मात्र वेगळाच प्रसंग ओढवला. छत्तीसगड व आंध्रच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचाचे तहसीलदार सूर्यकांत येवले व नायब तहसीलदार तेलंग या दोघांसाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त लावावा लागला. सिरोंचा तालुक्यात एक महिन्यापूर्वी कोतवाल भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यावेळी या दोघांनी इच्छुकउमेदवारांकडून एका कोतवालाच्या निवडीमागे दोन ते अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. हा प्रकार कानावर येताच या  अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असे नक्षलवाद्यांनी जाहीर केले. या अधिकाऱ्यांना सिरोंचात ठेवणे धोकादायक वाटू लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा मुख्यालयात बोलाविण्यात आले. त्यांना बंदोबस्तात आणताना पोलिसांची मात्र दमछाक झाली. जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्याचे मान्य केले असून या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.