29 May 2020

News Flash

कोटींच्या खर्चामुळे दारू परवाना खरेदीसाठी ग्राहकच मिळेना

भ्रमणध्वनीवरून पाहिजे तेथे पाहिजे तो ब्रॅन्ड १५० ते २०० रुपये अधिक पैसे घेऊन मिळत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चंद्रपूर जिल्ह्य़ातील १०६ दारू दुकाने विक्रीला

दारूबंदीमुळे या जिल्ह्य़ातील १०६ देशी दारू दुकाने विक्रीसाठी निघालेली असली तरी परवाना स्थलांतरणासाठी किमान दीड-दोन कोटींचा खर्च येत असल्यामुळे बंदीनंतरही दारू परवाना खरेदी करण्यासाठी ग्राहक मिळत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लवकरच राज्यातच दारूबंदी लागू करावी, या मागणीसाठी आंदोलन छेडणार असल्याने राज्यातील मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

या जिल्ह्य़ात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण दारूबंदी लागू करण्यात आली असली तरी येथे खुलेआम देशीविदेशी दारू विक्री सुरू आहे. भ्रमणध्वनीवरून  पाहिजे तेथे पाहिजे तो ब्रॅन्ड १५० ते २०० रुपये अधिक पैसे घेऊन मिळत आहे. जिल्हा पोलिस दलही दररोज लाखोची अवैध दारू जप्त करत आहेत. दरम्यान, बंदीमुळे या जिल्ह्य़ातील देशी दारूची १०६, तर विदेशी दारूची २४ दुकाने १५ महिन्यांपासून पूर्णत: बंद झालेली आहेत. त्यामुळे दारूबंदीच्या निर्णयानंतर १०६ देशी दारूविक्रेत्यांनी ही दुकाने आता विक्रीला काढलेली आहेत. मात्र, ती खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एका देशी दारू परवानाधारकाने दिलेल्या माहितीनुसार दुकान स्थलांतरणासाठीच्या जाचक अटी आणि यासाठी येणारा दीड-दोन कोटींचा खर्च बघता राज्यातील एकही दारूविक्रेती ही दुकाने खरेदी करण्यास तयार नाही. जो कुणी व्यावसायिक खरेदी करेल त्याला दुकान स्थलांतरणासाठी मोठय़ा अडचणी आहेत. तसेच स्थलांतरणाची फाईल जेथे जेथे जाईल तेथे तेथे त्याला खिसा खाली करावा लागणार आहे. तसेच कागदपत्रांची पुर्तता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, तेथील ना-हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. हे सारे लक्षात घेता हे परवाने खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याची चिंता या वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातच दारूबंदी लागू करावी, यासाठी आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तर मद्यविक्रेत्यांचे अवसानच गळाले आहे. या कारणामुळेही या परवानाधारकांना दुकान खरेदीसाठी ग्राहक मिळत नसल्याचे एका मद्यविक्रेत्याने लोकसत्ताजवळ बोलून दाखविली. दारूबंदीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेले येथील मद्यविक्रेते आता तिहेरी संकटात सापडले आहेत. एक तर अण्णांच्या आंदोलनाची धास्ती राज्यभरातील दारूविक्रेत्यांनी घेतली आहे. राज्य सरकारने संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतलाच तर आम्ही जायचे कुठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ते दुकाने विकायला तयार आहेत तर ग्राहक नसल्याने ते चिंतातूर झाले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी काही परवानाधारकांनी वृत्तपत्रात दुकान विक्रीच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या होत्या. मात्र, त्यालाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, अशीही माहिती याच विक्रेत्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2016 2:10 am

Web Title: chandrapur district 106 liquor shops for sale
Next Stories
1 जालना शहरातील तरुण पिढी गुटख्याच्या विळख्यात!
2 कर्जतमध्ये २९० मिमी पावसाची नोंद
3 जैतापूरप्रश्नी बाळ मानेंचा प्रकल्पग्रस्तांशी संवाद
Just Now!
X