लोकसत्ता वार्ताहर, चंद्रपूर

करोना संक्रमणात शहरात रस्त्याच्या कडेला खुर्च्या, कुंड्या, मातीचे भांडे, झुंबर विकण्यासाठी अनेक स्थलांतरित बंजारी वास्तव्यास आहेत. या बंजारी समाजातील लहान मुले आपल्या आई-वडिलासोबत व्यवसायात मदत करताना दिसतात. मात्र, ही स्थलांतरित मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षण न मिळाल्यामुळे या मुलांमध्ये गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाणे अधिक आहे. ही बाब लक्षात घेवून येथील आयएमए व रोटरी क्लबच्या डॉ. पल्लवी इंगळे, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. देशमुख आणि डॉ. मेघा घोडे यांच्या पुढाकाराने रस्त्यावरच या स्थलांतरित मुलांची शाळा भरवली जात आहे. दररोज सकाळी दोन तास या मुलांची शाळा भरवण्याचा कौतुकास्पद उपक्रम चंद्रपुरात राबवला जात आहे.

चंद्रपूर शहरातील नागपूर महामार्गावर अनेक स्थलांतरित बंजारी कुटूंब वास्तव्यास आहे. पारंपारिक व्यवसाय करून ते आपले उदरनिर्वाह करीत आहे. पारंपारिक व्यवसायाला त्यांची लहानगी मुले देखील हातभार लावतात. स्थलांतरित असल्याने त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची कोणतीही सुविधा नाही. करोनाच्या कालावधीत शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे त्यांच्या शिक्षणाचे दारसुध्दा बंद झाले होते. शिक्षणाअभावी ही कोवळी मुले गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी या डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेवून रस्त्यावरच स्थलांतरित मुलांसाठी शाळा सुरू केली. दररोज दोन तास ही शाळा चालते. या शाळेत मुलांना अक्षर ओळख, अक्षर लेखन, अंकगणित, इंग्रजी बाराखडी यांनी ओळख करून देण्यात येत आहे. रस्त्यावरच मुले मन लावून शिक्षणाचे धडे गिरवित आहे. दोन तास शाळा झाल्यानंतर राष्ट्रगीताने शाळेची सांगता करण्यात येते. या उपक्रमाला मुलांच्या पालकांचादेखील पाठिंबा आहे. मुलांना दररोज गरम दूध देण्यात येते. या डॉक्टरांच्या उपक्रमाने नवा सामाजिक पायंडा घालून दिला असून रस्त्यावरचा चालत असलेली शाळा ही आता कौतुकाची बाब झाली आहे.

“तीन आठवड्यापासून आम्ही या मुलांचे वर्ग घेत आहोत. नागपूर मार्गावर सायकलींग करतांना बंजारा समाजाची अस्वच्छ १५ ते २० मुल दिसून आली. चॉकलेट देवून त्यांचेशी संवाद साधल्यानंतर एका मुलाने पुस्तक, पेन,वही मागितली. त्यावरून मुलांना शिकायची इच्छा असल्याचे दिसून आले. काही मुले नागपूरला शाळेत गेली होती. तर काही अशिक्षित आहे. शिक्षणाची इच्छा लक्षात घेता दररोज सकाळी ७.३० ते ९.३० या दोन तासात रस्त्यावरच या मुलांना शिकविल्या जाते. आयएमएच्या निर्जरा प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांना दिवाळीत फराळ, स्वेटर वाटप केले. आमच्यातील खदीजा अली ही मुलांच्या आईंना शिक्षण देणे, एकूणच हा प्रकल्प अतिशय उत्कृष्टपणे सुरू आहे”, अशी माहिती डॉ. पल्लवी इंगळे यांनी दिली.

——–