चंद्रपूरमधील नागभीड तालुक्यातील तुकुम येथील राजेंद्र गनवीर (५५) या व्यक्तीस शेतामध्ये वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे. काल सायंकाळी राजेंद्र शेतात गेले होते.

वनपरिक्षेत्र नागभीड अंतर्गत तुकुम येथील शेतकरी राजेंद्र संभाजी गनवीर काल आपल्या जंगलालगत असलेल्या शेतावर काम करीत असतांना वाघाने त्यांना ठार मारले व घटनास्थळावरुन साधारण १५० मीटर दूरपर्यंत ओढत नेले.

राजेंद्र गनवीर हे सायंकाळी घरी परत न आल्यामुळे परिवारातील सदस्यांनी शोधाशोध केली असता, त्यांना घटना स्थळावर मृत राजेंद्र यांच्या चपला व वाघाच्या पंज्याचे ठसे आढळून आले. अंधार झाल्यामुळे वनविभागाला सूचना देण्यात आली. आज सकाळी शोध घेतला असता त्यांना राजेंद्र गनवीर यांचा मृतदेह घटना स्थळापासून १५० मीटर अंतरावर नागभीड वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.६३४ येथे अर्धवट खाल्लेल्या स्थितीत आढळून आला.

घटनास्थळी नागभीड वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड, वनरक्षक राहुल बुरले, वनरक्षक राहुल वगारे, मोक्का पंचनामा करीत असुन घटनास्थळी कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.