चंद्रपुरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन अंतर्गत मौजा पळसगांव येथे तलावाच्या बाजूला सदाशिव मोहुर्ले यांच्या शेतातील गोठ्यात वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी प्रवेश करून एका वासरास ठार मारले. त्यानंतर पहाटे वाघीण लगतच्या झुडपात लपून बसली व चरणदास बनसोड (६०) व विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनरक्षक सुनील गजलवार (३१) यांना जखमी केले. दरम्यान वाघिणीने गावात धुमाकूळ घातल्यानंतर ती झुडपात बसली असल्याने परिसरात कुणी फिरकू नये असे आवाहन ताडोबा व्यवस्थापनाने केले आहे.

ताडोबा बफर झोन मध्ये चिमूर तालुक्यात पळसगाव हे गाव आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास गावातील हनुमान मंदिराच्या परिसरात वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी प्रवेश केला. यानंतर त्यांच्या डरकाळ्या सुरू झाल्याने गावकरी जागे झाले. गावात वाघ शिरल्याची चाहूल लागताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान वाघीण व तिच्या दोन बछड्यांनी सदाशिव मोहुर्ले यांच्या गोठ्यात प्रवेश करून तेथील एका वासराचा फडशा पाडला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली.

यानंतर, रात्रीच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, एकाचवेळी वाघीण व दोन बछडे एकत्र दिसून आल्याने अतिरिक्त वनकर्मचारी बोलविण्यात आले. कर्मचारी येईपर्यंत दिवस उजाडला होता. तर, पहाटेच्या सुमारास रमेश मेश्राम यांना वाघीण आढळून आली होती. दरम्यान, वन विभागासोबत पोलिसांचा ताफा गावात दाखल झाल्यानंतर वाघीणीला जंगलात हाकलण्याचे प्रयत्न सुरू झाले. यात चवताळलेल्या वाघिणीने चरणदास बनसोड व विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे वनरक्षक सुनील गजलवार यांना जखमी केले. त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वनरक्षक गजलवार गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेनंतर गावात भीती व दहशतीचे वातावरण आहे. वाघीण व तिच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन पथक तैनात आहे. मात्र वाघीण अजूनही झुडपात लपून बसली असल्याने ग्रामस्थांनी या परिसरात येवू नये असे आवाहन ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.