चंद्रपुरमधील नागभीड तालुक्यातील देवपायली येथे बिबट्याने गावात येऊन घरात ठाण मांडल्याने, बाळापूर परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. या बिबट्याने स्वप्नील मासूरकर या युवकावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. अखेर, वनविभागाने बिबट्याला जेरबंद केल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
नागभीड तालुक्यातील देवपायली गावात बिबट्याने प्रवेश करून संदीप मडावी यांच्या कोंबड्यावर ताव मारला. यानंतर गावात बिबट्या आल्याचे कळताच नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे बिबट्याने एका घरातील शौचालयात ठाण मांडले. या अगोदर रस्त्यावर उभ्या असलेल्या स्वप्नील रामदास मासूरकर (२८) या तरूणाला झडप मारून त्याला जखमी देखील केले.
घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे क्षेत्र सहायक के.डी.गरमडे यांचे नेतृत्वात वनरक्षक एस.बी.चौधरी व एन.डी पेंदाम व इतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिबट्याला जेरबंद केले. तर, घटनेची माहिती मिळताच या क्षेत्राचे जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी स्वप्नील मासुरकरची विचारपुस केली. जखमी स्वप्नील मासूरकर याला त्वरीत आर्थिक मदत देण्यात यावी अशी गावकऱ्यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 4:42 pm