News Flash

चंद्रपूर – मोहाडी नलेश्वर येथे १०० एकर जागेत महिंद्रा क्लबचे हॉटेल सुरू होणार

पालकमंत्री वडेट्टीवार यांचे हस्ते सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन

चंद्रपूर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक येथे मोठ्या संख्येने भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर आता येथील मोहाडी नलेश्वार येथे महिंद्रा क्लबचेवतीने १०० एकर जागेवर पर्यटकांसाठी हॉटेल सुरू करण्यात येणार आहे, यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कच्चेपार जंगल सफारीच्या माध्यमातून या भागाच्या नावलौकिकात भर तर पडेलच, सोबतच रोजगारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील सिंदबोडी कच्चेपार जंगल सफारीचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सिंदेवाहीच्या नगराध्यक्षा आशा गंडाटे, जि.प.सदस्य रूपा सुरपाम, सहायक वनसंरक्षक रामेश्वारी भोंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी वडेट्टीवार पुढे म्हणाले, या भागातील मोहाडी नलेश्वार येथे महिंद्रा क्लबचे वतीने १०० एकर जागेवर पर्यटकांकरिता हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात येणार आहे, यातून येथील सुमारे ४०० नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. एका नामवंत अगरबत्ती कंपनीचा प्रकल्प येत असून त्याद्वारे ६०० महिलांना रोजगार प्राप्त होईल. तसेच गौण वनउपजावर आधारित ४२ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, या सर्व कामातून जवळपास दीड हजार नागरिकांना या भागात रोजगार उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण म्हणाले की, ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र हे वनसंपदा व वन्यजीवांच्या बाबतीत ताडोबापेक्षा कमी नाही, येथील नागरिकांनी पर्यटनाचा रोजगारासाठी फायदा करुन घ्यावा. यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते शामा प्रसाद जनवन योजनेंतर्गत मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी गावाला सौर कुंपण, सौर दिवे, गावालगत साफसफाई इत्यादी कामांसाठी १९ गावातील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सचिव यांना सुमारे पाच कोटींचे धनादेश वाटप केले. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी तसेच पिकांच्या संरक्षणासाठी होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वारी भोंगाडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

जंगल सफारीसाठी ३८ किलोमीटर ट्रॅक
कच्चेपार जंगल सफारीसाठी ३८ किलोमीटर ट्रॅक तयार असून या भागात वाघ, बिबट, अस्वल इत्यादी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. पक्षी प्रेमींसाठी हे जंगल नंदनवन असून विविध प्रकारचे पक्षी येथे मोठ्या प्रमाणात आहेत. जंगलात दोन तलाव व तीन पाणवठे आहेत. सफारीसाठी ७ वाहने मंजूर करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 8:56 pm

Web Title: chandrapur mahindra club hotel will be started on 100 acres of land at mohadi naleshwar msr 87
Next Stories
1 चिंताजनक : राज्यात दिवसभरात ४९ हजार ४४७ करोनाबाधित वाढले, २७७ रूग्णांचा मृत्यू
2 मोठी घोषणा! पहिली ते आठवी परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश
3 लॉकडाउनला अजून वेळ आहे की, तो पर्यायच नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? – भाजपा
Just Now!
X