‘कोविड मॅनेजमेंट पोर्टल’ने करोनाग्रस्तांचे हाल थांबले

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : शहरी तसेच ग्रामीण भागात करोना रुग्णांची खाटांसाठी धावाधाव सुरू आहे. बरेचदा गंभीर रुग्णांना खाटा उपलब्ध असूनही त्याची माहिती उपलब्ध होत नाही. या आशयाच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रुग्णांना त्यांच्या प्राथमिकतेनुसार आय.सी.यू., व्हेंटिलेटर व प्राणवायू खाटा मिळाव्या यासाठी चंद्रपूर कोविड-१९ पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित केले आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन प्राणवायू खाटा उपलब्ध करणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन  करण्यात आले. गंभीर रुग्णांना वेळेवर खाटा मिळण्यासाठी या प्रणालीचा निश्चितच उपयोग होणार असून रुग्णांची याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कोविड रुग्णांना चंद्रपूर शहरातील सर्व कोविड रुग्णालयात आय.सी.यू., व्हेंटिलेटर व प्राणवायू खाटाच्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा यादीनुसार खाटा उपलब्ध होतील. यासाठी सर्वप्रथम रुग्ण जवळच्या कोविड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयात गेल्यावर तिथे रुग्णांचे प्राणवायू पातळी व इतर बाबींची तपासणी करून त्याची नोंदणी सदर पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. नोंदणीनंतर प्रत्येक रुग्णाला एक टोकन नंबर देण्यात येईल. नोंदणी केलेल्या रुग्णांची खाटानिहाय प्रतीक्षा यादी तयार होईल. रुग्णाची गंभीर स्थिती पाहून केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार रुग्णाला चंद्रपूर शहरातील आवश्यक सुविधायुक्त रुग्णालयात खाट उपलब्ध होईल. सोमवारपासून शहरातील सर्व कोविड रुग्णालय रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतीक्षा यादीतीलच रुग्णांना भरती करून घेतील.

ऑनलाइन प्रणालीमुळे जुन्या रुग्णाला सुटी मिळाल्यावर रुग्णालयात रिक्त होणाऱ्या खाटांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व कोविड केअर सेंटरला लगेच उपलब्ध होईल. ही रिक्त खाट प्रतीक्षा यादीतील रुग्णाच्या नावे लगेचच उपलब्ध होईल. खाट मिळाल्याची  माहिती  संबंधित रुग्णालय तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे रुग्णाला दूरध्वनीद्वारे देण्यात येईल. या प्रणालीच्या माध्यमातून खाट उपलब्ध करून दिलेल्या रुग्णालयात रुग्ण थेट जाऊन उपचार घेतील.

ठळक वैशिष्टय़े

ऑनलाइन खाट वाटप प्रणालीमुळे रुग्णांची गैरसोय टळणार, गरजू रुग्णांना विहित वेळेत खाटा उपलब्ध होण्यास मदत, आय.सी.यू., व्हेंटिलेटर व प्राणवायू खाटांच्या तीन स्वतंत्र प्रतीक्षा याद्या होणार, प्रतीक्षा यादी डावलून कोविड रुग्णालयाला परस्पर रुग्ण भरती करता येणार नाही, रिक्त खाटा असताना खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाही, ही या प्रणालीची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.

कोविड रुग्णांसाठी वरीलप्रमाणे ऑनलाइन खाट वाटप प्रणाली चंद्रपूर जिल्ह्य़ात सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात येत आहे. रुग्णांना शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात अतिदक्षता, व्हेंटिलेटर व प्राणवायू खाटा मिळण्यासाठी याचा थेट लाभ होणार असून रुग्णांनी खाली दिलेल्या कोविड केअर सेंटर व रुग्णालयात नोंदणी करून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे पोर्टल कार्यान्वित करण्यासाठी नागपूर येथील लॉज त्रिमूर्ती या संस्थेचे सहकार्य लाभले आहे.

– अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपू

या पोर्टलच्या माध्यमातून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना आरोग्याविषयी माहिती आणि खाटा उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे. करोनाविरुद्धच्या लढय़ात स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, पोलीस, महसूल यांचे कर्मचारी अविरत कार्य करत आहेत त्यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे.  एकूण ११ समर्पित कोविड रुग्णालय, १९ समर्पित कोविड हेल्थ सेंटर, तर १८ कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. १४०० खाटांचे नियोजन पूर्ण झालेले असून त्यासोबतच, चंद्रपूर जिल्ह्य़ात ५०० खाटांचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यास मान्यता मिळाली आहे. रुग्णांना गावातच विलगीकरणात ठेवता यावे यासाठी विलगीकरण केंद्र उभारणीसाठी तसेच रुग्णांच्या आरोग्य सोयीसुविधेसाठी ८५० ग्रामपंचायतींना १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

– विजय वडेट्टीवार, पालकमंत्री, चंद्रपूर