करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या २ हजार १९१ नागरिकांवर चंद्रपूर महापालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून ४ लाख ४७ हजार ६९० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकानं सुरु ठेवण्याऱ्या आणि अवैध खर्रा विक्री करणाऱ्या दुकानदारांवरही दंड ठोठावण्यात आला आहे.

करोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन दररोज करण्यात येते. मात्र, तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत. याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकानं सुरु ठेवत असल्याचे व अवैध खर्रा विक्री करतांना आढळून आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या गेल्या आहेत. मात्र, काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून करोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा १८० लोकांवर मनपातर्फे कारवाई करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला २ मास्कसुद्धा देण्यात येत आहेत. यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात पथकं तैनात करण्यात आली असून दंडात्मक कारवाई सातत्याने सुरु राहणार आहे.