खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीस मनाई असतांना लपून खर्रा व इतर तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यवसायिकाला मनपातर्फे ५००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मनपाचे उपायुक्त विशाल वाघ व सहायक आयुक्त धनंजय सरनाईक भिवापूर प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी करुन परत येत असतांना महाकाली मंदिर देवस्थान परीसरात एक व्यवसायिक लपून खर्रा विक्री करतांना आढळल्याने सदर कारवाई करण्यात आली. उपायुक्तांनी अचानक टाकलेल्या धाडीने लपून खर्रा विकणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात खर्रा व इतर साहीत्य तर जप्त करण्यातच आले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाय केले गेले आहेत. राज्य शासनाने संपूर्ण राज्यात या पदार्थांची विक्री आणि साठवणुकीवर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. यामुळे सर्वत्र पानठेले बंद असले तरी अन्य मार्गांनी गुप्तपणे या पदार्थांची विक्री होत आहे. सकाळच्या वेळेस काही व्यवसायिक सायकलला, टू-व्हीलरला पिशव्या लावून खर्रा विक्री करत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे पालिकेने एक पथक तयार करुन अश्या व्यवसायिकांचा सर्वे सुरु केलेला आहे. खर्रा विक्री करतांना आढळून आल्यास त्याच्यावर तात्काळ पोलीस तसेच दंडात्मक कार्यवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. याकरीता कुणीही तंबाखु जाण्या पदार्थ विकु नये व कुणीही विकत न घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.