करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम मोडणाऱ्या ६८५ लोकांवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून एकूण १ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्या तसेच विनापरवानगी दुकानं सुरु ठेवण्याऱ्या दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला आहे.

करोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आढळून येत आहेत. याशिवाय काही दुकानदार विनापरवानगी दुकानं सुरु ठेवत असल्याचे आढळून आल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

आणखी वाचा- खळबळजनक : नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या यात्रेकरूंपैकी ७९५ जण निघाले करोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्व परवानगी घेऊन घराबाहेर पडणार्‍यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार शहरात मास्कशिवाय फिरणार्‍या व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

आणखी वाचा- Lockdown: राज्यात अडकलेल्या लोकांना गावी सोडण्यासाठी मोफत एसटी सेवा – वडेट्टिवार

याची अंमलबजावणी २३ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून मनपाच्या तीनही झोनमार्फत सक्तीने कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरीकाला ३ मास्कसुद्धा देण्यात येत असून, यादरम्यान सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरीकांवर विशेष लक्ष देऊन कारवाई करण्यात येत आहे.