पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी एका युवकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. ही घटना काल गुरुवार रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत किदरीटोला गावाजवळ घडली.

रवी जुरु पुंगाटी असे मृत युवकाचे नाव असून, तो गुंडजूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री ११ वाजेच्या सुमारास सशत्र नक्षलवादी रवी पुंगाटीच्या घरी गेले. यानंतर त्यांनी रवीला गावाबाहेर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. नक्षलवाद्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही टाकली असून, त्यात रवी पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेतला आहे.

या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वीच येथे वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करून दोन वन अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. त्यानंतर आता ही हत्येची घटना घडली आहे.