19 September 2020

News Flash

चंद्रपूरच्‍या बहिणीची राखी पंतप्रधानांकडे रवाना

आ. सुधीर मुनगंटीवार यांचे बांबू कारागीरांनी मानले आभार

चंद्रपूर

चंद्रपूरातील बांबू कारागिर श्रीमती मीनाक्षी मुकेश वाळके यांनी तयार केलेली बांबू शलाका राखी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना आ सुधीर मुनगंटीवार यांनी ११ ऑगस्टला पाठविण्यात आली आहे. मुनगंटीवारांच्‍या या पुढाकाराने बांबू कारागिरांमध्‍ये उत्साह संचारला आहे या राखी सोबत आ सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना एक हस्तलिखित पत्र प्रेषित केल्याने या राखी भेटीला भावनिक कंगोरा प्राप्‍त झाला आहे.

चंद्रपूर येथे तत्कालीन अर्थ व वनमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबू प्रशीक्षण व संशोधन केंद्र स्थापित करण्यात आले आहे. यातून हजारो कुशल बांबू कारागीर निर्माण होऊन रोजगार निर्मिती झाली. यातील एक बांबू कारागीर श्रीमती मीनाक्षी वाळके यांनी १० ते १२ गरजू आदिवासी व बुरुड समाजाच्या लोकांना रोजगार देत, आपली कला सर्वदूर पोहोचविण्यात यश मिळविले. लॉकडाऊन च्या काळात १० हजार राख्या तयार करून देशभर विक्री केल्या. इतकेच नव्‍हेतर मिनाक्षीने दिल्लीत २०१९ ला पार पडलेल्या अमेरिकेच्या ग्लोबल इनोव्हेंटिव्ह एक्सचेंज व युनायटेड नेशन समीटच्या सौंदर्य स्पर्धेसाठी “बांबू क्राउन” तयार केले. जगातील हा पहिला प्रयोग होता.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मिनाक्षीचे कौतुक केले. त्यावेळी मिनाक्षीने “बांबू शलाका राखी” पंतप्रधान मोदींजींना पाठविण्याची इच्छा बोलून दाखविली. एका बांबू कारागिराची भावना लक्षात घेत त्यांनी हस्तलिखित पत्रासह  बांबू शलाका राखी पंतप्रधानांना पाठविण्‍यात येईल याबाबत वाळके यांना आश्‍वस्‍त केले. त्याअनुषंगाने   महापौर राखी कंचर्लावार व मीनाक्षी वाळके यांचे हस्ते “पंतप्रधान नरेंद्रभाई  मोदींना आ सुधीर मुनगंटीवार यांचे हस्तलिखित पत्र व शलाका राखी” बंद लिफाफ्यात प्रधान डाकघर येथील प्रवर अधीक्षक ए. एन. सुशीर यांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी ही राखी स्पीड पोस्टने २ दिवसातच पंतप्रधानांना पोहोचती करण्याचे आश्वासन प्रवर अधीक्षक सुशीर यांनी दिल्याने  मिनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला.

चंद्रपूर महानगर भाजपा शाखेच्‍या वतीने आयोजित या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रधान डाकघर प्रवर अधीक्षक ए एन सुशिर यांची तर प्रमुख अतिथी म्हणून सह.अधीक्षक  आशिष बनसोड यांसह अनेक जण उपस्थित होते.

‘भाऊ’ असावा तर असा…

“अगदी शेवटच्या दिवशी पायपीट करीत बांबू संशोधन केंद्रात जाऊन प्रवेश घेतला. सुधीरभाऊंमुळे बांबू कारागीर झाले. त्यामुळे आणखी १० गरीब महिलांना रोजगार देता आला. त्यांच्या वाढदिवसाला मोदींजींना राखी पाठविण्याचा संकल्प सांगितला. त्यांनी ते लगेच मान्य केले नाहीतर माझे कौशल्‍य अधोरेखित करणारे पत्र पंतप्रधान मोदींजींना लिहिले आणि ते रवाना झाल्याची पोचपावतीसुध्‍दा मला मिळाली. खरंच भाऊ असावा तर असा”, अशी प्रतिक्रिया मीनाक्षी वाळके यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 6:23 pm

Web Title: chandrapur pm modi bamboo worker meenakshi bjp mla sudhir mungantiwar rakhi vjb 91
Next Stories
1 राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा – चंद्रकांत पाटील
2 बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी
3 “पवार साहेब, पार्थवर इतका राग CBI चौकशीच्या मागणीचा की राम मंदिराचे समर्थन केल्याचा?”
Just Now!
X