२२ जणांची तुकडी दाखल, २०० जवान ३० ऑगस्टला येणार

येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची २२ जणांची एक तुकडी सोमवारी दाखल झाली असून, सुरक्षेची सर्व सूत्रे या तुकडीने स्वत:कडे घेतली आहेत. ३० ऑगस्टला २०० सुरक्षा रक्षकांचे पथक दाखल होणार असल्याने आता चंद्रपूर वीज केंद्रावर कडक सुरक्षा राहणार आहे.

पुलगाव आयुध निर्माणीतील स्फोटानंतर राज्यातील सर्व आयुध निर्माणी, तसेच महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या वीज केंद्र परिसरात भंगार चोरांचा सुळसुळात, गेल्या काही वषार्ंत यातून झालेला गोळीबार आणि अशा अनेक घटनांमुळे वीज केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. खासगी सुरक्षा एजन्सीकडूनच वीज केंद्राच्या सुरक्षेत मोठेी खिंडार पडत असल्याचेही वारंवार समोर आले होते. या सर्व घटना बघता महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार गेल्या वर्षीच ही सुरक्षा व्यवस्था वीज केंद्रात तैनात होणार होती. मात्र, या सुरक्षा रक्षकांसाठी निवास व इतर कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे विलंब होत गेला. विशेष म्हणजे, वीज केंद्र व्यवस्थापनाने सुरक्षा व्यवस्थेसाठी लागणारा खर्च यापूर्वीच जमा केलेला होता. मात्र, तरीही औद्योगिक सुरक्षा दल येथे तैनात होण्यास सातत्याने विलंब होत गेला.

शेवटी, सोमवारी या सुरक्षा दलाच्या २२ रक्षकांची एक तुकडीने दाखल होताच वीज केंद्राच्या सुरक्षेची सर्व सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत. दरम्यान, येत्या ३० ऑगस्टला याच सुरक्षा दलाचे २०० जणांचे पथक दाखल होणार असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य जनसंपर्क अधिकारी परचाके यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. विशेष म्हणजे, या सुरक्षा दलाची २५० रक्षकांची तुकडी आहे. पहिल्या टप्प्यात २२ जण आले असून त्यानंतर २०० सुरक्षा जवान येणार असून उर्वरीत सुरक्षा जवानांची तुकडी तिसऱ्या टप्प्यात येणार असल्याची माहिती दिली. २३४० मेगाव्ॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात आता नवीन एक हजार मेगाव्ॉटचा प्रकल्पही आहे, त्यामुळे औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान वीज केंद्र परिसरातील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणार असल्याने वीज केंद्रातील चोरी, भंगार व कोळसा चोरीसह या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होणार आहे.