चंद्रपूर जिल्ह्यात मानद वन्यजीवरक्षक पदांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ सुरू असून पात्र उमेदवारांचे अर्ज बाद केल्या गेले आहेत तर राजकीय दबावात अनेकांच्या नावाची शिफारस सुरू असल्याचा आरोप ‘इअर्स’ या वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष सौरभ डोंगरे यांनी केला आहे.

चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रपरिषदेत डोंगरे यांनी मागील अनेक वर्षापासून मानद वन्यजीव रक्षक पदाची भरती अशाच पध्दतीने सुरू असल्याचे सांगितले. वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांसारख्या योग्य व्यक्तीला वन्यजीव रक्षकपदी संधी दिली यात गैर नाही. मात्र, काही राजकीय वशिल्यानेही नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. हा प्रकार आता राजरोसपणे सुरू झाला आहे, असाही आरोप डोंगरे यांनी केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मानद वन्यजीव रक्षक पदासाठी असंख्य वन्यजीव प्रेमी, कार्यकर्ते, वन्यजीव संस्थांमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यात बरेच प्रस्ताव वन विभागाव्दारे बाद करण्यात आले आहेत. आवश्यक सर्व कागदपत्रे जोडलेली असतानाही कागदपत्रे नाहीत असा शेरा मारून अनेकांना बाद करण्यात आले आहे. अनेक प्रस्ताव तर वरिष्ठांकडे पाठविण्यातच आले नाहीत. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी चुकीच्या निर्णयाला योग्य करून पात्र उमेदवारांचे अर्ज पाठवावेत. चुकीच्या व्यक्तींना अशा महत्वाच्या पदावर नियुक्त्या देऊ नयेत अन्यथा मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा व उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही डोंगरे यांनी दिला आहे.