लोकसत्ता वार्ताहर
गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये हा उद्देश समोर ठेवून ज्या गावात एक महिन्याच्या कालावधीत एकही करोनाबाधित मिळालेला नाही अशा ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा येत्या ४ ऑगस्ट पासून नियम व अटींसह सुरू करण्यात येणार आहे. या शाळा शुभारंभ उपक्रमासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निमंत्रण दिले असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत, पुनर्वसन व बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जि.प.सीईओ राहुल कर्डीले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत वडेट्टीवार यांनी शहरातील कॉन्व्हेंट, खासगी शाळा वगळता ग्रामीण भागात शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले. जिवती, गोंडपिंपरी तथा इतर अनेक भागातील ग्रामीणांकडे मोबाइल फोन घेण्याइतकेही पैसे नाहीत. त्यामुळे ते ऑनलाइन शिक्षण घेवू शकत नाही.
अशा स्थितीत त्यांच्या मुलांना शिक्षण देणे सरकारचे कर्तव्य आहे. एक महिना जिथे रूग्ण मिळाला नाही, किंवा शाळेत विलगीकरण कक्ष नाही अशा शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्याात अतिरीक्त खतांची मागणी काल झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत पुढे आली. कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलणे झाले आहे. ७ ते ८ हजार मेट्रीक टन युरीया पुरविण्याचे सूचवले आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस सोबत मानव व वन्यप्राणी संघर्षा संदर्भात बैठक घेण्यात आली ; यासंदर्भात वनमंत्री सोबत बैठक घेण्यात येणार आहे.
आयुष उपक्रमांतर्गत मोठ्याप्रमाणात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाय राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातला हा अभिनव प्रयोग केवळ या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्वाधिक सुसज्ज असे कोविड केअर सेंटर चंद्रपूर येथील वन अकादमीत आहे काल या संदर्भात मी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. आतापर्यत २९७ दाखल ;२०७ सुटी दिली आहे. आणीबाणीच्या प्रसंगी बाराशे बेड सध्या उपलब्ध आहेत. गरज पडल्यास आणखी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात अँटीजेन चाचणी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
ओबीसी, एसटी, फी संबंधीत व अन्य सर्व घटकातील कोणत्याही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कारणाखाली विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, पीक विमा भरण्याची मुदत वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 28, 2020 7:26 pm