ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रास लागून असलेल्या ‘बंदर कोल ब्लॉक’ ला कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीतून वगळण्यात यावे.या मागणीसाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन करण्यात आली.  कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीत, बंदर कोल ब्लॉकचा समावेश असल्याने ताडोबा-बोर-मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर-भ्रमण मार्ग संकटात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

व्याघ्र संवर्धनाकरिता, ताडोबाच्या सुरक्षेकरता, व्याघ्र भ्रमण मार्गाच्या सुरक्षेकरता, जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष वृद्धी टाळण्याकरता प्रस्तावित बंद कोल ब्लॉक लिलावा यादीतून वगळण्याची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

२०१० मध्ये तत्कालीन पर्यावरण मंत्री  जयराम रमेश यांची दिल्ली येथे भेट घेत, इको प्रो शिष्टमंडळाने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले  होते. सदर कोळसा खाणींमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा महत्त्वाचा कॉरिडोअर नष्ट होणार असल्याने जिल्ह्यातील व्याघ्र संवर्धनाकडे याद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. याची तात्काळ दखल घेत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) मार्फत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना पत्र देण्यात आले होते. सोबतच ‘एनटीसीए’ची एक कमिटी सुद्धा  कोल ब्लॉक क्षेत्रात पाठवण्यात आलेली होती. यानंतर ब्रह्मपुरी वनविभाग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे सदर कोळसा खान ताडोबा सोबतच व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे नमूद केले होते. यापूर्वी सुद्धा १९९९ मध्ये सदर कोल ब्लॉकची परवानगी नाकारण्यात आलेली होती.

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघाची संख्या, आवश्यक व्याघ्र अधिवासाची कमतरता, दिवासागणिक वाढत असलेला जिल्ह्यातील वाघ-मानव संघर्ष पाहता, व्याघ्र कॉरिडोर म्हणजेच वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्ग अधिक सुरक्षित करीत संवर्धन करण्याची गरज आहे.  दरम्यान सदर कोल ब्लॉकचा लिलाव म्हणजे ताडोबा प्रकल्प व व्याघ्र संवर्धनासाठी धोक्याची घंटा आहे, यामुळे इको-प्रो संस्थेने निदर्शने करीत सदर ‘बंदर कोल ब्लॉक‘ कोल इंडियाच्या लिलाव यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.

कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने करताना मास्क लावून  सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. रामाला तलाव परिसरात बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात इको-प्रोचे नितीन रामटेके, अब्दुल जावेद, धर्मेंद्र लुनावत, सुधीर देव, वैभव मडावी, सुमित कोहले, बिमल शहा, राजेश व्यास, अनिल अडगुरवार, राजू हाडगे, संजय सब्बनवार, अमोल, मनीष गावंडे, कुणाल देवगिरकर आदी या निदर्शनात  सहभागी झाले होते.