चंद्रपूर जिल्ह्य़ातील शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या शिक्षकांना चोरटय़ांनी हिसका दाखवला. शिर्डी पोलिसांनी मात्र या घटनेचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आíथक मदत मिळवून देण्याचा सल्ला शिक्षकांना दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना परतीच्या प्रवासासाठी शिर्डीतील काही नागरिकांकडून आíथक मदत मिळवून देऊन मार्गस्थ केले.
चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजूरा तालुक्यातील चुनाळा येथील शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल शिर्डीत आली होती. यात २२ मुली, १४ मुले, चार शिक्षक, एक महिला शिक्षक व एक शिपाई असे ४२ जण होते. शिर्डीत नाताळच्या सुट्टीनिमित्त गर्दी असल्यामुळे या सर्वाची संस्थानच्या भक्तनिवासात राहण्याची सोय होऊ शकली नाही, यामुळे संस्थानने तात्पुरत्या उभारलेल्या मंडपात विद्यार्थ्यांनी आसरा घेतला. येथे चोरटय़ांनी सहलीचे पैसे सांभाळणाऱ्या मुख्य शिक्षकाची २५ हजार रुपये असलेली बॅगच लांबविली. शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेलेल्या शिक्षकांनी पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याऐवजी परतीच्या प्रवासासाठी पैसे गोळा करण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी शिर्डीतील काही दानशुरांना स्वत: फोन करुन मदतीची विनंती केली.  सायंकाळी रेल्वेनी ही सहल नागपूरकडे मार्गस्थ झाली.