News Flash

चंद्रपूर : वाघ शिकार प्रकरणी दोघांना अटक; ११ नखे, मिशा, दात आरोपींकडून जप्त

दोन्ही आरोपींची चार दिवसांसाठी कोठडीत रवानागी ; विहीरगावच्या जंगलात आढळला मृत वाघ

प्रातिनिधिक छायाचित्र

चंद्रपुरमधील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मरेगांव नियतक्षेत्रात एक महिन्यापूर्वी वाघाची शिकार करून त्याचे अवयव काढल्याचे धक्कादायक प्रकरण वन विभागाने शोधून काढले आहे. या प्रकरणी नागेंद्र किसन वाकडे व सोनल अशोक धाडसे या दोन आरोपींना वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ नखे, मिशांचे १६ केस, चार हाडे व चार लहान दात जप्त केले आहेत. दोन्ही आरोपींना चार दिवसांची वन कोठडी ठोठावण्यात आली आहे.

वन विभागाला गुप्त माहितीच्या आधारे काल (सोमवार) वाघाच्या शिकारीची माहिती मिळाली होती. एक महिन्यापूर्वी ही शिकार झाली होती व वाघाचा मृतदेह नागेंद्र वाकडे व सोनल धाडसे या दोघांना मिळाला होता, असे समजले होते.

यावरून या दोन्ही आरोपींना वन विभागाने ताब्यात घेत चौकशी केली असता, मरेगाव नियतक्षेत्रात त्यांना वाघाचा मृतदेह आढळला. आरोपींनी ज्या ठिकाणाहून वाघाचा मृतदेह मिळाल्याचे ठिकाण दाखविले तिथे पाहणी केली असता मृत वाघाचे अकरा नखे, संपूर्ण दात व मिशा वगळून बाकीचे सर्व अवयव मिळाले. याप्रकरणी चौकशी केली असता, आरोपी वाकडे याने वाघाचे अकरा नखे, मिशांचे सोळा केस, चार हाडे व चार लहान दात घेतले असल्याचे समोर आले.

दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची चार दिवसांसाठी कोठडीत रवानगी करण्यात आली. ही चौकशी ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा , अति पोलिस अधिक्षक तारे, सहायक वनसंरक्षक बोंगाळे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी गोंड, वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड, श्रीमती ब्राम्हणे करित आहेत.

विहीरगावच्या जंगलात वाघाचा मृत्यू –

चंद्रपुरमधील मध्य चांदा वन विभागातील राजुरा परिक्षेत्रातील विहिरगाव नियतक्षेत्रामधील कक्ष क्रमांक १७२ मध्ये आज(मंगळवार) दुपारी वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. वन विभागाचे पथक गस्त करत असतांना हा मृतदेह आढळला. मृत वाघाचे सर्व अवयव सुरक्षित आहेत. त्याबाबतचा वन गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मृत वाघाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, पुढील चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 9:23 pm

Web Title: chandrapur two arrested in tiger poaching case 11 nails teeth confiscated from accused msr 87
Next Stories
1 ग्रामीण भागात २२२२ नव्या पदांसाठी भरती! दर्जेदार आरोग्य सेवेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय!
2 वर्धा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसमोर आमदार रणजीत कांबळेंच्या पक्षांतर्गत विरोधकांनी मांडले गाऱ्हाणे!
3 “बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”
Just Now!
X