करोनाच्या लोकडाउनमध्ये चंद्रपुरकरानी आज सूर्यग्रहण बघण्याचा आनंद घेतला. येथील जनता महाविद्यालयातील भूगोल विषयाचे प्राध्यापक तथा खगोल अभ्यासक डॉ. योगेश दुधपचारे यांनी चंद्रपूर शहरवासीयांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सूर्यग्रहणची सविस्तर माहिती दिली.

डॉ. दुधपचारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सूर्यग्रहण खंडग्रास होते, या ग्रहणाचा साक्षीदार होण्यासाठी आम्ही कुरुक्षेत्र हरियाणा येथे जाणार होतो. कदाचित तुम्हाला फेसबुक लाईव्ह तिथून दाखवता आले असते. परंतु करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करता आले नाही. आम्ही घरीच राहून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत सोलर ऑप्टिकलच्या मदतीने विद्यार्थी, मित्र मंडळींसोबत हे सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला.  झाडांच्या पानांच्या सावल्या जमिनीवर चंद्राच्या कोरी सारख्या पडतात हे आज सूर्यग्रहणामध्ये नोंदवता आले.

गुजरातला सकाळी 09:58 वाजता ग्रहणाची सुरुवात झाली. दुपारी 02:29 वाजता भारतातून ग्रहण संपले. आफ्रिकेतील कांगोपासून सुरू झालेले हे ग्रहण सूदान, इथिओपिया, येमेन, ओमान, सौदी अरेबिया, पाकिस्तान, भारत, तिबेट, चीन, तैवान याभागात दिसल्यानंतर पुढे पॅसिफिक महासागरात संपले आहे. या ग्रहणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा 21 जून या सर्वात मोठ्या दिवशी आलेले आहे. आज सूर्य भारतात कर्कवृत्तावर चमकणार आहे. तर, उत्तरेला आर्टिक रेषेवर 24 तासांचा दिवस असणार आहे.  दिल्लीलाच आज 13 तास 58 मिनिटं इतका मोठा दिवस आहे.सूर्यग्रहण बघण्याचा आनंद काही औरच होता अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.