राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीतील निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यतील कन्हाळगाव अभयारण्याला राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केले. अभयारण्याची अधिसूचना लवकरच निघणार असून २१० चौरस किलोमीटर क्षेत्र त्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

या अभयारण्याच्या निर्मितीविरुद्ध सुरुवातीपासून निषेधाचा सूर उमटत होता. त्यामुळे ३१ जानेवारीला झालेल्या १३व्या वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला होता. दरम्यान, आज बुधवारी झालेल्या बैठकीत सदस्यांनी हा विषय उपस्थित केला. मंडळाचे सदस्य अनिश अंधेरिया यांनी वाघांच्या स्थानांतरणाबाबत सादरीकरण केले. यात त्यांनी कन्हाळगाव परिसरात दहा वाघ असून कावल आणि टिपेश्वर परिसरात ते जात आहेत. त्या धर्तीवर या अभयारण्याची निर्मिती आवश्यक असल्याचे सांगितले. मंडळाचे दुसरे सदस्य बिलाल हबीब यांनीही राज्यात संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त कोणकोणत्या ठिकाणी वाघ आहेत याचे सादरीकरण केले. त्यातही हा विषय निघाला. सदस्य किशोर रिठे यांनी देखील हा मुद्दा पटवून दिला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कन्हाळगाव अभयारण्याला तत्त्वत: मान्यता दिली.

राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पात निसर्ग पर्यटनाला प्रोत्साहन देऊन स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पर्यटन बंदीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी करणारा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे पाठवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मानव-वन्यजीव संघर्षांचीही दखल

राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षांचा आलेख गेल्या काही वर्षांत वाढला आहे. हा आलेख कमी करण्यासाठी तसेच यावर खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचा मसूदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मानव-वन्यजीव संघर्षांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षित हत्तींची गरज आहे. तशी स्वतंत्र पथके तैनात केली जावीत, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीतील काही निर्णय

  • बोर अभयारण्याच्या विस्ताराला मान्यता. गरमसूर, किन्हीदोडका आणि रायपूर ही गावे अंतर्भूत. तसेच गावकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार भविष्यात ५० गावांचे पुनर्वसन.
  • भीमाशंकर तसेच राधानगरीला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व इतर काही प्रकल्पांची पाहणी करण्याचे निर्देश.