गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आलेले भीम आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांची अखेर सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर मालाडच्या हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

अनेक सामाजिक संघटनांकडून दबाव आल्यानंतर आझाद यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली आहे. नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यानंतर, मी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे जाऊन विजयस्तंभाचे दर्शन घेणारच असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. तसंच पुण्यातील भीम आर्मी संघटनेचे शहर अध्यक्ष दत्ता पोळ यांनीही लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना ठरलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम होईल आणि उद्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास देखील जातील, असे सांगितले.

चंद्रशेखर आझाद पुण्यात चार वाजेपर्यंत पोहचणार असून पुण्यातील सभेबाबत आम्ही मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सभेच्या परवानगीबाबत थोड्याच वेळात निर्णय येईल. आम्हाला परवानगी मिळेल असा विश्वास दत्ता पोळ यांनी व्यक्त केला. आझाद यांना नजरकैदेत ठेवून लोकशाही धोक्यात आणण्याचे काम या सरकारने केले आहे. प्रत्येक व्यक्तीला भूमिका मांडण्याचा अधिकार असून त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात त्यांचा कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. मात्र मुंबईत कार्यक्रम होऊ दिला नाही. पण आम्ही पुण्यात कार्यक्रम घेणारच. आता चंद्रशेखर आझाद हे दुपारी चार वाजेपर्यंत पुण्यात पोहचतील. तसेच ठरलेल्या नियोजनानुसार कार्यक्रम होईल आणि उद्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास अभिवादन करण्यास देखील जातील. असे त्यांनी सांगितले.