वाळूचे ट्रक सोडण्यासाठी दूरध्वनीही केला नाही. माझ्या नावाने दुसऱ्याने दूरध्वनी केला का, याची मला माहिती नाही, असे सांगतानाच इतिवृत्ताची शहानिशा करून प्रशासनाने कारवाई करावी, असे ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
कामठी तालुक्यातील वाळू तस्करांचे ट्रक सोडण्यासाठी पालकमंत्र्यांनी दूरध्वनी केला असल्याची बाब जिल्हा महसूल खात्याच्या आढावा बैठकीच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आली आहे. त्या आधारावर ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित केल्यावर खळबळ उडाली होती. या संदर्भात बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे पीक कर्ज वाटपाची माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, ती अधिकाऱ्यांची बैठक होती. त्या बैठकीशी माझा संबंध नाही.  मी ट्रक सोडण्यासाठी दूरध्वनी केला नाही. प्रसार माध्यमात वृत्त आल्यावर मी इतिवृत्ताबाबत माहिती घेतली असता तो ट्रक मुरुमाचा असल्याचे सांगण्यात आले. (इतिवृत्तात तो ट्रक वाळूचाच, आहे असे स्पष्ट नमूद आहे.) तो सोडण्यासाठी माझ्या नावाने कोणी दूरध्वनी केला, याची माहिती नाही. पण आता इतिवृत्त बदलता येत नाही. त्यामुळे त्याची शहानिशा करून प्रशासनाने अहवाल तयार करावा व त्यानंतर पुढील कारवाई करावी.
पालकमंत्री झाल्यानंतर वाळू चोरांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आपणच पोलीस व महसूल खात्याला दिले होते. त्यानुसार मागील वर्षीच्या तुलनेत ५५० वाहने अधिक पकडण्यात आली आहेत, असे बावनकुळे यांनी सांगितले. इतिवृत्त खोटे आहे काय, असा सवाल त्यांना केला असता त्यांनी अधिकाऱ्यांना विचारा, असे सांगितले. इतिवृत्ताची शहानिशा करण्यास सांगून पालकमंत्र्यांनी त्यात अप्रत्यक्षरित्या दुरुस्ती करण्याचेच संकेत दिले आहेत.