कलावंतांची इच्छाशक्ती प्रबळ असते, जिथे कुणी पोहोचू शकत नाही, तेथे त्याची कल्पनाशक्ती पोहोचते. चंद्रपूरच्या हौशी कलावंताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या मातोश्रीसोबतचे तैलचित्र रेखाटले. हे तैलचित्र त्यांना भेट म्हणून पंतप्रधानांच्याच हातात द्यायचे होते. मात्र, वाटेत विघ्नच विघ्न. पंतप्रधानांची भेट घेणे सोपे नाही हे कळल्यावर या कलावंताने आपली इच्छा मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्यामार्फत राज्याचे अर्थ व जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमारे व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी लगेच पंतप्रधानांसोबत भेट घडवून आणत त्या कलावंताची इच्छा पूर्ण केली. चंदू पाठक असे त्या हौशी कलावंताचे नाव आहे.

देशातील महानुभावांचे तैलचित्र रेखाटणे आणि त्यांना ते स्वत:च्या हाताने भेट देत त्यांचा अभिप्राय मिळवणे हा चंदू पाठक यांचा छंद. माजी पंतप्रधान दिवं. राजीव गांधी, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अतिमाभ बच्चन, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, दिवं. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तब्बल ३९ महानुभावांचे तैलचित्र त्यांनी रेखाटले व भेट दिले आहे.

चंदू पाठक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्री यांचे तेलचित्र रेखाटले. मोदींच्या मातोश्री मोदींना आशीर्वाद देत असतानाचे हे चित्र कुंचल्याचा अविष्कारच. मात्र, हे तैलचित्र थेट पंतप्रधानांना कसे द्यायचे, असा प्रश्न पाठक यांच्यापुढे होता. त्यांनी स्वत: पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून पंतप्रधानांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, दखल घेण्यात आली  नाही. त्यानंतर पाठक यांनी मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांच्या समवेत राज्याचे अर्थमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपली इच्छा व्यक्त केली. पाठक यांची इच्छा साधी नव्हती. मुनगंटीवार यांनी लगेच २५ जानेवारी २०१८ ला पंतप्रधान कार्यालययाशी पत्रव्यवहार करून पाठक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली. १९ मार्चची तारीख मिळाली. मात्र, पाठक कधी दिल्लीला गेले नाहीत. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात एवढय़ा मोठय़ा सुरक्षा यंत्रणा पार करीत जायचे कसे, या विचाराने ते घाबरले. त्यांनी मुनगंटीवार यांच्यासमोर ही भीती व्यक्त केली.

मुनगंटीवारांनी लगेच चंद्रपूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे व प्रदीप आलूरवार यांना पाठक यांच्यासोबत दिल्लीला रवाना केले. १९ मार्चला चंदू पाठक यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना तैलचित्र प्रदान केले.