‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकणात मोठं नुकसान झाले आहे. बागायतीच व घरांचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाने त्यांना मदत केली पाहिजे. सध्याचे निकष बागायतीसाठी अपुरे आहेत ते बदलले पाहिजेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते श्रीवर्धन येथे पत्रकारांशी बोलत होते.

शासनाने सध्या जाहीर केलेली मदत अपुरी आहे, बाधित घरांच्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार आहे, त्यामुळे पूर्णपणे पडलेल्या घरांसाठी शासनाने 3 लाखांची मदत द्यावी, जास्त नुकसान झालेल्या घरांसाठी 1 लाखाची मदत द्यावी. तर  अंशतः नुकसान झालेल्या घरांना 25 हजार नुकसान भरपाई द्यावी. त्यासाठी नुकसानीचे निकष बदलावे अशी मागणी त्यांनी केली, भाजपाकडून आम्ही वादळग्रस्त भागाला मदत करत आहोत, केंद्र सरकारकडूनही पॅकेज मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.