रूग्णांची सुश्रुषा नि:स्पृह भावनेने करणाऱ्या परिचारिकांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अजूनही वाईटच आहे. खरे तर परिचारिका आपली सेवा बजावताना त्यात ईश्वरी अंश दिसून येतो, असे उद्गार कवी माधव पवार यांनी काढले.
सोलापूरच्या करूणाशील समितीच्यावतीने राज्यातील ११ परिचारिकांना करूणाशील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. किलरेस्कर सभागृहात आयोजिलेल्या या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कवी माधव पवार हे बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. नसीमा पठाण यांच्यासह छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयातील मेट्रन नसीमा सौदागर, करूणाशील समितीचे संस्थापक-अध्यक्ष आशुतोष नाटकर, वत्सला नाटकर आदींची उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे बारावे वर्ष होते. मालती डोंगरे (नागपूर), सुप्रिया रेडकर (सावंतवाडी), शोभा पन्हाळकर (कोल्हापूर), नलिनी शनिवारे (नागपूर), प्रतीक्षा लोटणकर (मुंबई), शालिनी जाधव (लातूर), सुशीला गोपालकृष्णन (मुंबई), तनुजा वाटकर (नागपूर), प्रमिला गायकवाड (मुंबई), माया गायकवाड व कल्याणी गोयल (सोलापूर) या पुरस्कार मानकरी परिचारिकांनी करूणाशील पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार रुग्णालयातील परिचारिका अपर्णा पानसरे यांचा मुलगा जयंत पानसरे यास ‘सारेगमप’मध्ये उपविजेतेपद मिळाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.
कवी पवार यांनी रूग्णसेवा म्हणजे ईश्वरी सेवाच असून ही सेवा करणाऱ्या परिचारिकांना समाजात स्थान मिळायला हवे. रुग्ण कोणत्या जातीचा,धर्माचा आहे, याचा विचार न करता त्याचा आजार कोणता आहे, हे पाहून त्यानुसार निष्काम भावनेने परिचारिका वैद्यकीय सुश्रुषा करतात. त्यांच्या सेवेची दखल घेऊन दिल्या जाणाऱ्या पुरस्कारामध्ये करूणा आणि शील हे तत्त्व दिसून येते, असे त्यांनी नमूद केले. या वेळी प्राचार्या डॉ. नसीमा पठाण यांनी मातृह्दयाला भिडणारा हा पुरस्कार सोहळा असल्याची भावना व्यक्त केली.