प्रशांत देशमुख

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मार्च ते एप्रिल दरम्यान उष्णतेची तीव्र लहर राहण्याचा इशारा देत उपाय करण्याच्या सूचना राज्यांना केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील व्यवस्थेत बदल करण्यासाठी  जिल्हा यंत्रणेस सतर्क केले  आहे.

मार्च ते मे २०१९ या काळात सामान्यापेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात व अन्य काही राज्यांसह मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व आंध्रप्रदेशच्या किनारी भागात उष्णतेचा प्रकोप जाणवू शकतो. अशा उष्णतेच्या प्रभावाने बहुआयामी प्रशासकीय बदल करणे अपेक्षित असल्याचे प्राधिकरणाचे सांगणे आहे. लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी किमान आवश्यक सूविधा पुरवण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहे.

उपाययोजना कोणत्या?

मतदारांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी मतदान केंद्रावर तात्पुरते शेड  प्रत्येक केंद्रावर विशेष ‘मेडिकल किट’ (आरोग्यपेटी) पुरवले जाईल.  तीनशे लिटरची पाण्याचा कॅन मतदारांसाठी उपलब्ध.पेयजल सुविधा नसणाऱ्या मतदान केंद्रावर पाणी साठवणूक क्षमता निर्माण करण्याचे निर्देश आहे. रांगेतील मतदारांना पाणी देण्यासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्याचीही सूचना आहे.

दोन दिवसापूर्वीच आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. उन्हापासून मतदारांचा बचाव करण्यासाठी उपाय केले जातील. मेडिकल किट ठेवले जाणार आहेत. उन्हामुळे मतदान प्रभावित होऊ नये यासाठी उपाय केले जाणार आहे.

– विवेक भीमनवार, जिल्हा निवडणूक अधिकारी