‘बॉम्बे उच्च न्यायालया’चे नामांतर मुंबई उच्च न्यायालय असे करण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्राकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. डाव्होस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकरिता जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळात अन्य केंद्रीय मंत्र्यांसह फडणवीस यांचीही निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पर्यावरण, आर्थिक प्रश्न, तसेच इतर विषयांवर बोलण्याबरोबरच तेथे येणाऱ्या उद्योजकांना भेटून महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची डेटा बँक तयार करण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. उपग्रहाच्या माध्यमातून जमिनींचे मोजमाप केले जाईल. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील योजना निश्चित केली जाईल. राज्याचा महसूल विभाग त्याकरिता काम करीत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.