आषाढीसाठी सोय

पंढरपूर : आषाढी यात्रेला राज्यातून लाखो भाविक पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला येतात. इथे दर्शनाला आलेले भाविक चंद्रभागा नदीत स्नान करतात. नदीमध्ये स्नान केल्यावर महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी यावेळी खोली (‘चेंजिंग रूम’) उभारण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अशा फिरत्या २० ‘चेंजिंग रूम’ उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.

आषाढी यात्रेमध्ये राज्यातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक येतात. सावळ्या विठुरायाचे दर्शन, चंद्रभागा स्नान आणि नगरप्रदक्षिणा करून आपली वारी ते पोहोचती करतात. येणाऱ्या भाविकांमध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे. चंद्रभागा नदीमध्ये स्नान केल्यावर या महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी कोणताही आडोसा किंवा सुविधा नाही. या पाश्र्वभूमीवर चंद्रभागा नदीच्या तीरावर महिलांसाठी ‘चेंजिंग रूम’ यात्रा कालावधीत उभारण्यात येणार आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी या कामी पुढाकार घेतला आहे.

यंदाच्या वर्षी फिरते ‘चेंजिंग रूम’चे वाहन तयार करण्यात आले आहे. या ‘चेंजिंग रूम’चा एकावेळी  दहा महिला वापर करू शकतील. तीरावर विविध २० ठिकाणी ‘चेंजिंग रूम’ ठेवल्या जाणार आहेत. या फिरत्या ‘चेंजिंग रूम’चे एक मॉडेल जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी तपासून निश्चित केले आहे.  यातील सहा ‘चेंजिंग रूम’ ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांचे सूर्योदया फाउंडेशन बसवून देणार आहे. उर्वरित ‘चेंजिंम रूम’साठी देखिल सध्या काही भाविक देणगीदार हे मंदिर समितीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे यंदाच्या वारीच्यावेळी महिला भाविकांची याबाबतची गैरसोय मोठय़ा प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.