जय श्रीरामच्या घोषणांची सक्ती करत, औरंगाबादमध्ये रात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करण्यात आली. १० ते १२ अज्ञातांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती झोमॅटोचा कर्मचारी असल्याचं समजलं आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे
Muslim youth threatened to chant ‘Jai Shri Ram’ in Aurangabad
Read @ANI Story | https://t.co/w9af3bi2YK pic.twitter.com/dIgSyPx8OD
— ANI Digital (@ani_digital) July 22, 2019
२० जुलै रोजी म्हणजे शनिवारीच अशाच प्रकारची एक घटना औरंगाबादमध्ये घडली होती. एका मुस्लिम तरुणाला हडको कॉर्नरजवळ अडवून मारहाण करण्यात आली होती. तसेच त्याला जय श्रीरामच्या घोषणा देण्यास भाग पाडले गेले होते. याप्रकरणीही पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. इम्रान पटेल असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव होते. तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. ही घटना ताजी असतानाच तशीच एक घटना औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मॉब लिंचिंगच्या (झुंडबळी) घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. याबद्दल कठोर कायदा का आणला जात नाही? असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. तसेच याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं असंही त्यांनी म्हटलं होतं. औरंगाबादमध्ये शनिवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेतही अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा तपास पोलीस घेत आहेत. ते प्रकरण शमते न शमते तोच आता झोमॅटोच्या कर्मचाऱ्याला जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत मारहाण करण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे.
First Published on July 22, 2019 6:46 am