औरंगाबाद महानगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी नगरसेवकांनी घातलेल्या राड्यामुळे प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महानगरपालिकेला ३ सप्टेंबरपर्यंत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर कामाचा आढावा घेण्यासाठी आज पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर सभागृहातील नगरसेवकांनी थेटपणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली. नगरसेवकांनी शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. अधिकारी काम करत नसून ते गेंड्याच्या कातडीचे आहेत, असे नगरसेवकांनी सभागृहात जाहीरपणे म्हटले. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर नगरसेवक आयुक्तांवर तुटून पडले. यावेळी नगरसेवकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजीही केली. या सगळ्या गोंधळानंतर पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांनी सभात्याग केला. औरंगाबाद शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी असा दर्जा दिला आहे. मात्र, खड्ड्यांमुळे राजधानी असलेल्या या शहराची अवस्था फारच बिकट झाली आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत. दोन वर्षापूर्वी अशीच स्थिती निर्माण झाली होती, पण त्यावर पॅचवर्कचा उतारा देण्यात आला होता. यंदा पुन्हा रस्त्यांची अवस्था तशीच झाली आहे, पण पॅचवर्कचा उतारा देण्यास महापालिकेचे प्रशासन तयार नाही. ‘खड्डे पडले तर पडले, आम्हा काय त्याचे’ अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप झाले तरी पालिकेचे प्रशासन डोळे मिटून गप्प आहे. खड्डे बुजविण्याच्या कामात भ्रष्टाचार होतो, त्यातून बदनामी होते अशी उपरती पालिकेच्या आयुक्तांना झाली आणि पॅचवर्क किंवा आणखी काही करायचे नाही, अशी अघोषित भूमिकाच अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नगरसेवक आणि पालिका अधिकारी यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.