पावसाने उघडीप दिल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पशुधन जगवायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जिल्ह्यात २ लाख ९० हजार ८५२ मेट्रिक टन चाऱ्याची तूट निर्माण झाली आहे. पुढील आठ-दहा दिवसांत चाऱ्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ११ पकी ६ तालुक्यांत चारा छावण्या चालू करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे शिफारस केली.
जिल्ह्यात ८ लाख २५ हजार ४५४ छोटीमोठी जनावरे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दोन हजारांपासून ते २ हजार ४०० रुपयांपर्यंत कडबा विक्री होत आहे. बीडमध्ये कडबा विक्री करणारे १० व्यापारी आहेत. बीडमधूनच जिल्हाभरात कडबा पोहोचवला जातो. आठवडय़ाला १० हजार कडब्याची विक्री होत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे कडबा विक्री वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी २०० ते ४०० रुपयांनी भाववाढ झाली आहे. जिल्ह्यातील सौताडा, मुगगावसह उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथून मोठय़ा प्रमाणात कडबा बीडमध्ये विक्रीसाठी आणला जात आहे.
पशुधन जगविण्यास शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. कडबा महाग असूनही खरेदी केला जात आहे. पावसाअभावी शेतातील पीक करपले. अशा स्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध कसा होणार? या विवंचनेत शेतकऱ्यांपुढे छोटीमोठी जनावरे जगवण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंगळवापर्यंत आष्टी तालुक्यात ८८ हजार ७६३, बीड ३५ हजार ६२, गेवराई ६३ हजार ६९७, केज ३१ हजार १६५, पाटोदा २७ हजार १३१, शिरूर ४५ हजार ३४ मेट्रिक टन चाऱ्याची तूट निर्माण झाली आहे. एकूण २ लाख ९० हजार ८५२ मेट्रिक टन चाऱ्याची तूट निर्माण झाली आहे. आष्टी तालुक्यात सर्वाधिक चाराटंचाई आहे. पुढील आठ-दहा दिवसांत या ६ तालुक्यांत चाऱ्याची टंचाई तीव्रतेने भासणार आहे. कमी पर्जन्यमानाचा फटका चाऱ्याला बसला आहे. यासंदर्भात सहायक आयुक्त पशुसंवर्धन यांनी चाराटंचाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला. या अहवालाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी विभागीय आयुक्तांकडे आष्टी, बीड, गेवराई, केज, पाटोदा, शिरूर या सहा तालुक्यांत चारा छावणी चालू करण्यासाठी शिफारस केली. चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार ६ तालुक्यांत जनावरांसाठी चारा छावणी सुरू होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. उर्वरित ५ तालुक्यांतही चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे.