प्रशांत देशमुख
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचार आणि तत्त्वज्ञानाचा अंगीकार आजही गरजेचा आहे. नव्या पिढीला त्यांच्या कार्याचा दाखला इतिहास अभ्यासासह कलाकृतींमधूनही व्हावा, या उद्देशाने समृद्धी महामार्गावर चरखा पूल साकारला जाणार आहे. गांधी जिल्हय़ाची ओळख म्हणून वर्धा-अमरावती जिल्हय़ास जोडणाऱ्या नदीवर या अनोख्या सेतूची उभारणी होईल.
महाआघाडीच्या सरकारच्या काळात या महामार्गाचे नामकरण बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे करण्यात आले. याच महामार्गावर वर्धा-अमरावती जिल्हय़ास जोडणाऱ्या नदीवर चरखा पूल साकारणार आहे. दोन जिल्हय़ांच्या सीमेवर चरख्याचे दोन मोठे ४० मीटर गोलाकार कठडे असतील. त्यांना जोडणारा एक १६ मीटरचा गोलाकार कठडा राहील. पुलाच्या मधोमध ही प्रतिकृती राहणार आहे. या महामार्गावर एकूण ३२ पूल बांधले जाणार आहेत. गांधी जिल्हय़ाची ओळख म्हणून चरखा तसेच नागपूर, बुलढाणा, नाशिक आणि ठाणे जिल्हय़ांची ओळख दर्शवणाऱ्या प्रतिकृतीही या महामार्गावर असतील. त्यांची संकल्पचित्रे आकारास येत आहेत, असे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
होणार काय?
पुलाच्या दोन्ही बाजूने चरख्याची प्रतिकृती असलेले कठडे उभारले जातील. गांधीजींच्या चरख्याने जगभर गांधी विचार जिवंत ठेवला. जगातील सगळय़ात मोठा चरखा सेवाग्रामला उभा राहिला. आता चरखा पूल उभारला जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2020 12:19 am