फ्रावशी अकॅडमी, रचना विद्यालय, पळसेची जिल्हा परिषद शाळा, शिंदे येथील छत्रपती विद्यालय या शाळांनी विविध गटांमध्ये  ३८ व्या नाशिक तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविला. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी शाळेत पंचायत समिती आणि नाशिक तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आ. अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी शाळांना आणि शिक्षक व विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वेळी शालेय समिती अध्यक्ष डी. एस. कुलकर्णी, पंचायत समिती उपसभापती कैलास चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजयश्री चुंबळे, पंचायत समिती सदस्य सुशिला वाघेले उपस्थित होते. तालुक्यातील शहरी व ग्रामीण विभागांतील २२५ प्राथमिक व माध्यमिक शाळांनी प्रदर्शनात सहभाग घेतला. स्वागत मुख्याध्यापिका सी. एम. कुलकर्णी यांनी केले. प्रास्तविक विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांनी केले. या वेळी आ. ढिकले, चुंबळे, कुलकर्णी गटशिक्षणाधिकारी महेंद्र भोये यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दिलीप अहिरे यांनी केले. वसुंधरा अकोलकर यांनी आभार मानले.  पहिली ते आठवी विज्ञान उपकरण गटात प्रथम फ्रावशी अकॅडमी, द्वितीय होरायझन अकॅडमी, तृतीय डे केअर सेंटर, नववी ते बारावी शहरी गटात प्रथम रचना विद्यालय, द्वितीय बॉइज टाऊन, तृतीय श्रीराम विद्यालय या शाळांनी यश मिळविले. शहरी शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात एन. एन. अहिरे (ज्योती विद्यालय, पिंपळगाव बहुला), माध्यमिक गटात संजय सोनार (सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय), शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा सहायक ए. बी. जाधव (मराठा हायस्कूल), लोकसंख्या नाशिक शहरी प्राथमिक गटात एस. जी. कुशारे (मराठा हायस्कूल), माध्यमिक गटात दिलीप अहिरे (सीडीओ मेरी हायस्कूल) यांना प्रथम क्रमांक मिळाला. पहिली ते आठवी ग्रामीण गटात जि.प. शाळा पळसे (प्रथम), विल्होळी शाळा (द्वितीय). मुंगसे शाळा (तृतीय), उत्तेजनार्थ इंदिरानगर गाळोसे, नववी ते बारावी ग्रामीण गटात छत्रपती विद्यालय शिंदे (प्रथम), संत आईसाहेब स्कूल पळसे (द्वितीय), माध्यमिक विद्यालय पळसे (तृतीय), उत्तेजनार्थ बळीराम हिरे विद्यालय, दरी, शैक्षणिक साहित्य गटात सोमा देशमुख, सामंतगाव (प्रथम), माध्यमिक गटात एस. एच. सूर्यवंशी, गंगावरे (प्रथम), शैक्षणिक साहित्य प्रयोगशाळा सहायक डी. आर. देवरे, गिरणारे, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात मनीषा गायकवाड, सय्यद पिंप्री, लोकसंख्या शिक्षण माध्यमिक गटात अमरसिंग परदेशी, वंजारवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळविले.