माल विक्री केल्याची थाप मारून कमिशन देण्याचे आमिष दाखवून एका वयोवृध्द व्यापाऱ्याला एक कोटी २० लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी तिघा संशयित भामटय़ांविरूध्द बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शीत राहणारे शब्बीर महमद तांबोळी (६३) यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत रंगनाथ फल्ले, त्यांचा मुलगा आशिष व अनिल श्रीधर तोडकरी (तिघे रा. बार्शी) अशी आरोपींची नावे आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून या तिघांनी तांबोळी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तांबोळी यांचे बार्शीत आडत बाजारात आडत दुकान आहे. फल्ले व तोडकरी यांनी त्यांच्याशी ओळख वाढवून व्यवहार केला. तांबोळी यांच्या दुकानात येऊन या तिघांनी आपण इतर व्यापाऱ्यांना मालाची विक्री केल्याचे खोटे सांगून बनावट टिपण दाखविले आणि त्यावर कमिशन देतो, असे सांगून तांबोळी यांची विश्वास संपादन केला. नंतर या तिघांनी वेळोवेळी मिळून एक कोटी १९ लाख १० हजार ६२४ रुपये इतक्या रकमेची फसवणूक केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या गुन्ह्य़ात अद्यापि कोणालाही अटक झाली नाही.
अज्ञात पुरुषाचा खून
दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथे एका ४५ वर्षांच्या अज्ञात पुरुषाचा खून करून गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात टाकून देण्यात आल्याचा प्रकार घडला. यासंदर्भात सोमनाथ नागप्पा पैलवान (रा. तांदूळवाडी) यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गावाच्या शिवारात एका शेतात अनोळखी पुरुषाचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. डोक्यात दगड घालून चेहरा विद्रूप करून व अंगावर ठिकठिकाणी जखमा करून खून केला गेला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. तसेच हा खून कोणी व कशासाठी केला, याचाही शोध घेतला जात आहे.