11 December 2017

News Flash

कीटकनाशके फवारणीच्या बळींना जबाबदार कोण?

शेतकऱ्यांच्या मृत्यूंच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या पथकाने या संबंधी अनेक कारणे दिले आहेत.

न.मा.जोशी, यवतमाळ | Updated: October 4, 2017 10:28 AM

अत्यंत जहाल औषधे फवारण्याबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शनाचा अभाव

कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना १८ शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला. उपचार घेत असलेल्या ७५० आणि २५ शेतकऱ्यांना आलेल्या अंधत्वाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून शासकीय स्तरावर मृत्यूंच्या कारणांचा शोधघेण्यासाठी सारी यंत्रणा कामास लागली आहे.

कापूस आणि सोयाबीन पिकांवर झालेल्या रोग, अळी आणि किडींच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या १८ शेतकरी शेतमजुरांच्या मृत्यूने व उपचार घेत असलेल्या  ७५० वर तसेच २५ शेतकऱ्यांना आलेल्या अंधत्वाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून शासकीय स्तरावर ‘मृत्यूंच्या कारणांचा शोध’ घेण्यासाठी सारी यंत्रणा कामास लागली आहे. नेमके कोणतेही एक कारण नसल्याचे आणि अनेक घटकांचा एकत्रित परिणाम असल्याचे  सांगण्यात  येत आहे.

शेतात फवारणी करताना प्रामुख्याने ‘मोनोक्रोटॉफॉस’ आणि ‘प्रोफेनाफॉस’ ही अतिजहाल, मानवी आरोग्य व पर्यावरणाला अत्यंत घातक कीटकनाशके फवारली जात आहेत. मोनोक्रोटॉफॉस आणि प्रोफेनाफॉस या दोन्ही ओषधांचे मिश्रण असलेले सुपरफॉस हे आणखी तिसरे कीटकनाशक फवारले जात आहे. याशिवाय कमी विषारी असलेले ‘इनोमॅक्टीन’ आणि ‘क्लोरोफोमीटॉल’ ही कीटकनाशकेही वापरात आहेत. अतिजहाल कीटकनाशक असलेल्या डब्यांवर लाल त्रिकोणांचे चिन्ह असते तर कमी विषारी औषधी असलेल्या डब्यांवर निळा, पिवळा, हिरवा अशा रंगांची खूण असते. शेतकऱ्यांनी लाल त्रिकोणी चिन्ह असलेले औषध वापरू नये असा सल्ला शेतकऱ्यांचे मृत्यू झाल्यावर जागे झालेल्या कृषी विभागाने दिला आहे.

शेतकऱ्यांच्या मृत्यूंच्या कारणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या पथकाने या संबंधी अनेक कारणे दिले आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारताना घ्यावयाची जी काळजी घ्यावयाला पाहिजे ती घेतल्या जात नाही. वास्तविक पाहता कोणती काळजी घ्यावी याबाबत कृषी विभागाने कधीच जनजागृती केली नाही. मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर भित्तिपत्रके छापून ते वाटण्याचे जे काम केले ते साप गेल्यावर लाठी मारण्यासारखे आहे. जिल्ह्य़ात एकूण १२२७ कृषी केंद्रे आहेत. मात्र, केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचनांचे फलक किंवा पत्रके लावलेले नाहीत, पत्रके वाटलेली नाहीत. बनावट बियाण्यांची विक्री करण्याऱ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त केलेला नाही. हे सर्व झाले पाहिजे अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथे विश्राम भवनात आयोजित आढावा बठकीत दिल्या. हे करा ते करा, हे झाले पाहिजे, ते झाले पाहिजे, असे सरकार सांगते तर मग हे करावे कुणी? असा प्रकार सुरू आहे.

चिनी बनावटीची फवारणी यंत्रे

फवारणीची कीटकनाशके, औषधे चिनी बनावटीची असल्याच्या चच्रेत तथ्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, फवारणीसाठी वापरावयाची काही फवारणी यंत्रे ही चिनी बनावटीची आहेत. या यंत्रामुळे फवारणी लवकर होते. मात्र, पाणी कमी आणि कीटकनाशकांचे प्रमाण लक्षात न घेता तसेच शास्त्रीय पद्धतीने मिश्रण न करता ते फवारणी यंत्रात टाकून फवारले जाते. वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी सांगितले की, फवारणी करताना आवश्यक ती सर्व काळजी घेणे हाच यावरील उपाय आहे. डब्यावर लाल रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके अतिजहाल असल्याने आणि त्यांच्या विक्रीला बंदी नसली तरी शेतकऱ्यांनी ती अजिबात वापरू नये. हिरव्या रंगाचे चिन्ह असलेले औषधच वापरणे सुरक्षित आहे. शेतकऱ्यांनी फवारणीनंतर कपडे बदलले पाहिजेत, पण तेच ते शेतकरी शेतमजूर फवारणी करतात आणि तेच ते कपडे वापरतात असे दिसून येते.

ऊन आणि आद्र्रतेचा घातक संयोग

सध्या वातावरणात कडक ऊन आणि आद्र्रतासुद्धा असल्याने फवारणी करताना श्वास घेतेवेळी कीटकनाशके शरीरात जातात. कपाशीचे पीक डोक्याइतके झाले आहे आणि फवारणी योग्यरीत्या झाली की नाही शेतकरी पिकाच्या आत डोकावून पाहतात.

किडीची रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढलेली आहे. त्यामुळे पुन्हा फवारणी करावी लागते. उन्हामुळे होणारे निर्जलीकरण अशा वातावरणात आंतरप्रवाही अतिजहाल कीटकनाशकांची होणारी फवारणी मानवी आरोग्यास जीवघेणी ठरते म्हणून फवारणी करतानाच काळजी घेणे नितांत गरजेचे असल्याचे मत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

..तर मग सरकार कशासाठी आहे?

फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आíथक मदत शासनाने द्यावी अशी मागणी खुद्द शासनात असलेले केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हटले आहे. ज्यांना निर्णय घेऊन अंमलबजावणी करायची आहे तेच जर मागण्या करत असतील हा प्रकारच हास्यास्पद असल्याची टीका शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने केली आहे. कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण? कीटकनाशके फवारण्यापूर्वी घ्यावयाची काळजी कोणती याबाबत कृषी विभागाचा नाकत्रेपणा, उपलब्ध डब्यांपकी लाल रंगाचे डबे अतिजहाल विषारी आहेत हे लक्षात न घेता लवकर उपाय योजना करण्यासाठी त्यांचा केलेला वापर, फवारणीसाठी आवश्यक कीट पुरवण्याबाबतची शासनाने पूर्ण न केलेली जबाबदारी, हवामानातील बदल, उष्णता आणि आद्र्रता यांचा हानीकारक संयोग, कीटकनाशक आणि पाण्याचे मिश्रण करताना शास्त्रीय पद्धतीची नसलेली माहिती, चिनी बनावटीच्या फवारणी यंत्राची बाजारपेठेत असलेली भरमार अशा अनेक बाबींची सार्वत्रिक चर्चासुद्धा सुरू आहे.

First Published on October 3, 2017 4:37 am

Web Title: chemical insecticide issue agriculture department farmers death issue