19 January 2018

News Flash

रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर

पिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते.

प्रबोध देशपांडे, अकोला | Updated: October 3, 2017 4:35 AM

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष

विदर्भातील शेतकऱ्यांकडून घातक रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सध्या कीटकनाशक फवारणीच्या कामाचा ठेका देण्याची पद्धत प्रचलित झाली असून, सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहेत. अनेकवेळा त्यातून मृत्यूही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याची गरज व्यक्त करून, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कीटकांच्या प्रतिकारशक्तीत वाढ होत असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य पीक संरक्षक डॉ. ए.व्ही.कोल्हे व कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ.डी.बी.उंदिरवाडे यांनी दिली.

पिकांवर पेरणीपासून ते उगवणीपर्यंत विविध प्रकारच्या कीड व रोगाचे आक्रमण होत असते. या किडीचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३० ते ७० टक्क्य़ांपर्यंत घट येऊ शकते. पिकावरील किडींची संख्या व त्यांचा प्रादुर्भाव सतत बदलत असतो. त्याला जैविक घटक व अजैविक घटक जबाबदार आहेत. त्यामुळे पिकांवरील किडींचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. नियमित सर्वेक्षणामुळे कीटकनाशकांच्या फवारण्या व त्यांची मात्रा कमी करता येते. तसेच कीटकनाशकांचा संतुलित वापर करता येतो. कीटकनाशकांचा योग्य वापर हा एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. मात्र, अद्यापही शेतकरी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करीत नसल्याचे कृषी विद्यापीठाच्या पाहणीत समोर आले आहे. विदर्भात प्रामुख्याने कपाशी पिकावर रस शोषक किडी व बोंड अळ्यांसाठी फवारणी केली जात आहे. रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर केल्यास नसíगक कीटक शत्रू नाहक मारले जातात. त्यामुळे किडींचा उद्रेक होऊन किडीमध्ये प्रतिकारशक्ती वाढत जाते. त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे डॉ. कोल्हे व डॉ. उंदिरवाडे यांनी सांगिलते.  विदर्भातील यवतमाळ व इतर काही जिल्ह्य़ांमध्ये कीटकनाशकांच्या फवारण्यामुळे शेतमजुरांना बाधा होत असल्याचे प्रकार समोर आले. विषबाधा टाळण्यासाठी फवारणी तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. सध्या पश्चिम विदर्भात दमट, उष्ण व प्रखर उन्हाचा पारा असे वातावरण आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड ओळीने केली. यावर्षी कपाशीची एक ते दीड फूट जास्त वाढ होऊन साडेचार ते सहा फूट आहे. त्यामुळे कपाशी दाटलेली असून अशा पिकात सहज फिरता येणे शक्य नाही. या कपाशीमध्ये हवा व ऊन खेळते नसल्याने पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक किडी व बोंड अळ्यांना पोषक आहे. त्यामुळे सध्या ठेका पद्धतीने कीटकनाशकांची फवारणी करण्याची पद्धत आहे. काही शेतमजूर सतत फवारणीचीच कामे असल्याने त्यांच्यावर घातक परिणाम होत आहेत. सतत कीटकनाशकाच्या संपर्कामुळे त्वचेची अ‍ॅलर्जी, खाज, सतत डोकेदुखी, अशक्तपणा, मळमळ, चक्कर येणे, दृष्टी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. फवारणी करताना द्रावण अंगावर, डोळ्यात व श्वासाद्वारे नाकामधे जाते. तसेच फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे, विडी ओढणे, हात न धुता पाणी पिणे आदी प्रकार सर्रास आढळून आले. त्यामुळे कीटकनाशकाचे अंश पोटात जाऊन मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे विषबाधा होऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. कोल्हे व डॉ. उंदिरवाडे यांनी केले आहे. फवारणी करताना शिफारस केलेली दर्जेदार कीटकनाशके खरेदी करावीत, तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये, कीटकनाशकाची मात्रा फवरणीसाठी मोजून घ्यावी, फवारणी करताना संरक्षक कपडे, बूट, हातमोजे, नाकावरील मास्क आदीचा वापर करावा, पंपाचे नोझलमधील कचरा तोंडाने फुंकून काढू नये, कीटकनाशकाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे, कीटकनाशकाचा पर्यावरणाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी, कीटकनाशके फवारलेल्या शेतामध्ये इशारा फलक लावावा आदी काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

प्रादुर्भावाची पडताळणी न करताच फवारणी

पिकावर किडींचा प्रादुर्भावाच्या तीव्रतेची पडताळणी न करताच फवारणी केली जाते. सर्वेक्षण केल्यावर किडीची आíथक नुकसान संकेत पातळी सरासरी १० रस शोषक किडी प्रती पान तसेच बोंडअळ्या ५ टक्के यांचे एकत्रित नुकसान असल्यास कीटकनाशकाचा वापर आवश्यक ठरतो. त्या किडीचा केवळ प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अ‍ॅझ्ॉडिरेक्टिन ३०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करण्याचा सल्ला डॉ. कोल्हे व डॉ. उंदिरवाडे यांनी दिला.

First Published on October 3, 2017 4:33 am

Web Title: chemical insecticide uses issue farmers issue
  1. No Comments.