प्रकृती अस्वास्थामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना १० मे रोजी केईएम रूग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ते आज सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. तुरुंगातून आणि रुग्णालयातून बाहेर आल्यावर आज त्यांनी पहिले ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या देशभरातील चाहत्यांचे आपल्याला दिलेल्या साथीबद्दल आभार मानले. बेहिशेबी मालमत्ता आणि काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली दोन वर्षे तुरूंगात घालवल्यानंतर नुकताच त्यांना जामीन मंजूर झाला होता. जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्यावर मुंबईतील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लिलावती रूग्णालयात जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांत आले आहे.

आपल्या या ट्विटमध्ये भुजबळ म्हणतात, ”माझ्या बांधवांनो आणि माता भगिनींनो,माझ्यावर विश्वास व्यक्त करून आपण मला नेहमीच साथ दिली,त्यामुळे मी आपला आभारी आहे,देशाच्या कानाकोपऱ्यातून आपण मला भेटण्यासाठी उत्सुक आहात,याची मला कल्पना आहे. माझ्यावरील वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर मी आपल्याशी प्रत्यक्ष संवाद साधायला येणार आहे.” भुजबळ यांच्यावर स्वादुपिंडावरील आजारावर उपचार सुरू होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरीही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

रुग्णालयातून सोडल्यानंतर भुजबळ मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले होते. याबरोबरच भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. १० जूनला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या समारोपाला छगन भुजबळ हे पुन्हा राजकारणात सक्रिय होतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती. त्यामुळे भुजबळ यांनी केलेले ट्विट आणि पक्षाच्या स्थापना दिनाला राहिलेले काही दिवस राजकारणाच्या दृष्टीने नक्कीच सूचक ठरु शकतात.