दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेल्या अटकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 100 कोटींचं कंत्राट दिलं असताना 850 कोटी कसे काय खर्च होतात अशी विचारणा त्यांनी केली. पाच फुटांच्या गाईला 15 फुटांचं रेडकू कसं होईल ? असा खोचक प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. नरेंद्र मोदींचा दिवसा भूलभुलय्या सुरु आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा यात्रेनिमित्त गुहागर येथे ते बोलत होते.

‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 25 हजार कोटी खाल्ले असं बोलतात. मग म्हणाले 10 हजार कोटी खाल्ले. आता म्हणतात 850 कोटी….अरे कंत्राट फक्त 100 कोटींचं होतं. ज्याने महाराष्ट्र सदन बांधलं तो कोकणात जाऊन बसला आहे. ज्याने इतकी सुंदर इमारत बांधली त्याला एक रुपयादेखील दिला नाही. तो माणूस मला 850 कोटी रुपये कसा देईल ?’ असा सवाल त्यांनी विचारला.

‘पाच फुटांची गाय गाभण राहिली आणि बाळंत झाली तर तिला 15 फुटांचं रेडकू होईल का ? 100 कोटींचं कंत्राट दिल्यानंतर 850 कोटी खर्च होतात ?’, असा प्रश्न यावेळी छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना त्यांनी मला अडीच वर्ष आतमध्ये ठेवलं. मला का पकडलं ते मलाही माहित नाही. ज्यांनी पकडलं त्यांनाही माहित नाही असं म्हणत सरकारवर ताशेरे ओढले.